वेदाबेस​

अध्याय अठरावा

मोक्षसंन्यासयोग

श्लोक 1: अर्जुन म्हणाला, हे महाबाहो हृषीकेश! हे केशीनिसूदन! मला त्याग आणि संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे.

श्लोक 2: श्रीभगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वजन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात.

श्लोक 3: काही विद्वजन घोषित करतात की, सर्व प्रकारच्या सकाम कर्माना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की, यज्ञ, दान, तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये.

श्लोक 4: हे भरतश्रेष्ठ! आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नरशार्दूल, शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहे.

श्लोक 5: यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि तप ही तर महात्म्यांनादेखील पवित्र करतात.

श्लोक 6: ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ! ही कर्मे कर्तव्यबुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे.

श्लोक 7: नियत कर्माचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते.

श्लोक 8: जो मनुष्य, नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्याने रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते.

श्लोक 9: हे अर्जुन! ज्या वेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो त्या वेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो.

श्लोक 10: सत्त्वगुणात स्थित असलेला बुद्धिमान त्यागी, अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्मात आसक्त राहात नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतात.

श्लोक 11: देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे खरोखर शक्य नाही. परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय.

श्लोक 12: जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकारचे कर्मफलप्राप्त होते. परंतु जे संन्यासाश्रमात आहेत त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही.

श्लोक 13: हे महाबाहू अर्जुन! वेदान्तानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची पाच कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे.

श्लोक 14: कर्माचे स्थान (शरीर), कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा -ही पाच कारणे होत.

श्लोक 15: शरीराने, वाणीने किंवा मनाने न्याय्य किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या पाच कारणांमुळे घडत असते.

श्लोक 16: म्हणून या पाच कारणांचा विचार न करता, ज्याला वाटते की, तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही.

श्लोक 17: जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही.

श्लोक 18: ज्ञान, ज्ञेय आाणि ज्ञाता ही तीन कर्माला प्रेरणा कारणे होत, इंद्रिये, कर्म आणि कर्ता हे तीन कर्मांचे घटक आहेत.

श्लोक 19: प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे तीन प्रकार आहेत. ते प्रकार आता माझ्याकडून ऐक.

श्लोक 20: ज्या ज्ञानामुळे अनंत रूपांत विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त' आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज.

श्लोक 21: ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरांत भिन्न-भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस होय असे जाण,

श्लोक 22: आणि ते ज्ञान, ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, त्याला सत्याचे ज्ञान राहात नाही व जे अतिशय अल्प असते, त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात.

श्लोक 23: जे कर्म नेमलेले आहे व आसक्तीशिवाय केले जाते, जे रागद्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात.

श्लोक 24: परंतु फलाशेची इच्छा धरणा-या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते, ते रजोगुणी कर्म होय.

श्लोक 25: जे कर्म मोहाने, शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुस-यांना क्लेश देण्याकरिता केले जाते, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात

श्लोक 26: जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता, मिथ्या अहंकाराविना, निश्चयाने आणि उत्साहाने, यशापयशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे महटले जाते.

श्लोक 27: जो कर्ता, कर्म आणि कर्मफलांप्रति आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्षाळू, अपवित्र व सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो, त्याला रजोगुणी कर्ता म्हटले जाते.

श्लोक 28: जो कर्ता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुस-यांचा अपमान करण्यात तरबेज असतो व जो आळशी, सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो, त्याला तमोगुणी कर्ता असे म्हटले जाते.

श्लोक 29: हे धनंजय! प्रकृतीच्या तीन गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो ते ऐक.

श्लोक 30: हे पार्थ! ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय.

श्लोक 31: हे पार्थ! जी बुद्धी, धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यांमधील भेद जाणूशकत नाही ती राजसिक बुद्धी होय.

श्लोक 32: भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय.

श्लोक 33: हे पार्थ! जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय.

श्लोक 34: परंतु हे अर्जुन! ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त असतो तो निश्चय राजसिक होय.

श्लोक 35: हे पार्थ! जी धृती, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजेच तामसी धृती होय.

श्लोक 36: हे भरतश्रेष्ठा! बद्ध जीव ज्या तीन प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखांचा अंत होतो ते तीन प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक.

श्लोक 37: जे आरंभी विषासमान प्रतीत होते, परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूपसाक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे.

श्लोक 38: इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख, जे प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते.

श्लोक 39: आणि जे सुख स्वरूपसाक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते.

श्लोक 40: या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही, जो या प्रकृतीच्या तीन गुणांपासून मुक्त आहे.

श्लोक 41: हे परंतप! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे.

श्लोक 42: शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता - या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात.

श्लोक 43: शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात.

श्लोक 44: कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे.

श्लोक 45: आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. हे कसे शक्य होते याविषयी आता माझ्याकडून ऐक.

श्लोक 46: सर्व जीवांचा उद्‌गम आणि सर्वव्यापी असणा-या भगवंतांची पूजा करून, मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो.

श्लोक 47: मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे, परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही.

श्लोक 48: ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कोंतेया! मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये.

श्लोक 49: जो आत्मसंयमी, अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो.

श्लोक 50: हे कोंतेया! ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था, अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण. याचे आता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो.

Text 51-53: आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून, इंद्रियतृप्तीच्या विषयांचा त्याग करून, आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांतस्थळी राहतो, जो मिताआहार करतो, आपली काया, वाचा आणि मन संयमित करती, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो, ममत्वरहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत होतो.

श्लोक 54: याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही. तो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते.

श्लोक 55: मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवदधामात प्रवेश करू शकतो.

श्लोक 56: माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली, माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते.

श्लोक 57: सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर. अशा भक्तियोगामध्ये, पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो.

श्लोक 58: जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि, जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील.

श्लोक 59: जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील.

श्लोक 60: मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारीत आहेस; परंतु हे कौंतेया! तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील.

श्लोक 61: हे अर्जुन! परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत.

श्लोक 62: हे भारता! पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल.

श्लोक 63: याप्रमाणे मी तुला अत्यधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर.

श्लोक 64: तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्वज्ञानामधील अत्यधिक गुह्यातर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे म्हणून ते माझ्याकडून ऐक.

श्लोक 65: सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस.

श्लोक 66: सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पांपापासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस.

श्लोक 67: जो तप करीत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही तसेच जो माझा द्वेष करतो, त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये.

श्लोक 68: जो मनुष्य, भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल. यात मुळीच संशय नाही.

श्लोक 69: त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही.

श्लोक 70: आणि मी असे घोषित करतो की, जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो.

श्लोक 71: आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो.

श्लोक 72: हे पार्थ! हे धनंजय! तू हे एकाग्रचित्ताने श्रवण केलेस का? आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का?

Text 73: अर्जुन म्हणाला, हे कृष्ण! हे अच्युत! माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दूढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे.

Text 74: संजय म्हणाला याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे.

Text 75: व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे.

Text 76: हे राजन्! श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादांचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण, पुनः पुन्हा हर्ष होत आहे.

Text 77: हे राजन्! भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुनः पुन्हा हर्ष होत आहे.

Text 78: जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामथ्र्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com