श्लोक 9 . 11
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११ ॥
शब्दार्थ
अवजानन्ति-उपहास करतात; माम्-मला; मूढाः-मूर्ख लोक; मानुषीम्-मनुष्य रूपामध्ये; तनुम्—देह; आश्रितम्—धारण करून; परम्—दिव्य; भावम्-स्वरूप; अजानन्तः—न जाणता; मम-माझे; भूत-अस्तित्वातील सर्व गोष्टींचा; महा-ईश्वरम्-परम अधिपती किंवा महेश्वर
भाषांतर
जेव्हा मी मानवसदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत.
तात्पर्य
या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनावरून स्पष्ट आहे की, भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असूच शकत नाहीत तरीही असे अनेक मूर्ख लोक आहेत, जे श्रीकृष्णांना महापुरुषाव्यतिरिक्त इतर काहीही मानत नाहीत. वस्तुत: ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे तेच आदिपुरुष भगवंत आहेत.
ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत आणि एक ईश्वर दुस-यापेक्षा मोठा वाटतो. भौतिक जगातील सामान्य व्यवस्थापनेत आपल्याला प्रशासक किंवा मार्गदर्शक आढळतो, त्याच्यावर सचिव असतो, त्याच्यावर मंत्री आणि त्याच्याही वर अध्यक्ष असतो. त्यांच्यापैकी प्रत्येकजण नियंत्रक असतो, परंतु एकाचे नियंत्रण दुसर्याद्वारे केले जाते. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की, श्रीकृष्ण हे परमनियंता परमेश्वर आहेत. निःसंदेह या भौतिक जगतात आणि आध्यात्मिक जगतातही अनेक ईश्वर आहेत, परंतु श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत (ईश्वरः परम: कृष्ण:) आणि त्यांचा देह अप्राकृत सच्चिदांनदमयी आहे.
पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाही. भगवंतांचा विग्रह सच्चिदानंद आहे. ते जरी साधारण मनुष्य नसले तरी मूखच त्यांचा उपहास करतात आणि त्यांना साधारण मानवच मानतात. त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी 'मानुषी'म्'म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण अर्जुनाचा मित्र व कुरुक्षेत्राच्या युद्धामधील राजनीतीज्ञ याप्रमाणे साधारण मनुष्यवत् ते कार्य करीत होते. अशा अनेक प्रकारे ते साधारण मनुष्याप्रमाणेच कार्य करीत होते; परंतु त्यांचे शरीर म्हणजे सच्चिदानंद विग्रह आहे. वेदांमध्येही याला पुष्टी मिळाली आहे. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय-मी सच्चिदानंदरूप भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो. (गोपाल तापनि उपनिषद् १.१) वेदांमध्ये इतर वर्णनेही आहेत. तम् एकम् गोविंदम्-तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे गोविंद आहात. सच्चिदानंद विग्रहम्- आणि तुम्ही सच्चिदानंद आहात. (गोपाल तापनि उपनिषद् १.३५)
भगवान श्रीकृष्णंचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही भगवद्गीतेवरील असे अनेक तथाकथित विद्वान आणि भाष्यकार आहेत, जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अवमान करतात. विद्वान मनुष्य हा जन्मत:च आपल्या पूर्व-सत्कर्मामुळे प्रतिभावान असू शकेल; परंतु त्याचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांबद्दल अशी संकल्पना असते. म्हणून त्यांना मूढ म्हटले जाते, कारण केवळ मूख व्यक्तीच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात. भगवंतांच्या विविध शक्ती आणि दिव्य लीलांचे मूखांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात. त्यांना माहित नसते की, श्रीकृष्णांचे स्वरुप पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमयी आहे. अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे ते स्वामी आहेत आणि कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात. श्रीकृष्णांच्या ठायी इतके दिव्य गुण आहेत हे त्यांना माहीत नसल्याने ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात.
तसेच, भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे या भौतिक जगतात अवतीर्ण होतात, हे सुद्धा त्यांना माहीत नसते. ते भौतिक शक्तीचे अधिपती आहेत. अनेक ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे (मम माया दुरत्यय) भगवंत म्हणतात की, माझी मायाशक्ती जरी अतिशय प्रबळ असली तरी ती माझ्या अधीन आहे आणि जो कोणी मला शरण येतो तो मायाशक्तीच्या तावडीतून सुटू शकतो. जर श्रीकृष्णांना शरण गेलेला जीव भौतिक शक्तीच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो तर संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करणार्या भगवंतांचे शरीर, आपल्याप्रमाणेच प्राकृत कसे असू शकेल? म्हणून श्रीकृष्णांविषयीची ही कल्पना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तरीही साधारण मानवाप्रमाणे प्रतीत होणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व अणू-परमाणूचे आणि विराट विश्वरूपाचेही नियंत्रक असू शकतात, हे मूर्ख लोकांच्या बुद्धीपलीकडे असते. अतिशय प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तू या त्यांच्या कल्पनातीत असतात म्हणून ते कल्पना करू शकत नाहीत की, मनुष्यदेह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण कसे करू शकतात. वस्तुत: भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करीत असले तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात. त्यांच्या योगम् ऐश्वयं-अर्थात, दिव्य अचिंत्य शक्तीबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ते एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करू शकतात. हे जरी मूर्खाच्या कल्पनेपलीकडे असले तरी, जे शुद्ध भक्त आहेत ते याचा स्वीकार करतात, कारण त्यांना माहीत असते की, श्रीकृष्ण हेच स्वयं पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत. म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण जातात आणि कृष्णभावनाभावित भगवद्भक्तीमध्ये युक्त होतात.
भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत, परंतु कृष्ण-विज्ञान समजण्याकरिता, भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत हे अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की, श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत. जरी ते मानवरूपात भूतलावर अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत. श्रीमद्भागवताच्या (१.१.२०) प्रथम स्कंधातील प्रथम अध्यायामध्ये शौनक आदी ऋषींनी श्रीकृष्णांच्या क्रियांबद्दल जिज्ञासा करताना म्हटले आहे की:
कृतवान किल कर्माणि सह रामेण केशव:। अतिमर्त्यानि भगवान् गूढ: कपटमानुष:।।
‘‘भगवान श्रीकृष्णांनी बलरामासहित मानवाप्रमाणे क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे गूढ रूपामध्ये त्यांनी अनेक असाधारण लीला केल्या.'श्रीकृष्णांचे मानवरूपातील अवतरणे मूखांना गोंधळात टाकते. या भूतलावर असताना श्रीकृष्णांनी केलेल्या अद्भुत कृत्याचे अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही. वसुदेव आणि देवकीसमोर जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले; परंतु आपल्या मातापित्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी साधारण बालकाप्रमाणेच द्विभुज रूप धारण केले. श्रीमद्भागवतात (१०.३.४६) सांगितल्याप्रमाणे बभूव प्राकृत: शिशुः-ते एका साधारण बालकाप्रमाणे, सामान्य मनुष्याप्रमाणेच झाले. या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले आहे की, भगवंतांचे सामान्य मनुष्य म्हणून झालेले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचेच रूप आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातही सांगण्यात आले आहे की, श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी अर्जुनानेही प्रार्थना केली. (तेनैव रूपेण चतुर्भुर्जेन) चतुर्भुजरूप प्रकट केल्यावर, अर्जुनाच्या याचनेवरून त्यांनी पुन्हा मनुष्याप्रमाणेच द्विभुज रूप धारण केले. (मनुषं रूपम्) भगवंतांची ही विविध रूपे निश्चितच साधारण मनुष्याची रूपे नाहीत.
श्रीकृष्णांचा जे उपहास करतात आणि मायावादी तत्वज्ञानाने जे प्रभावित झाले आहेत, ते श्रीकृष्ण हे साधारण मनुष्यच असल्याचे सिद्ध करण्यासाठी श्रीमद्भागवतातील पुढील श्लोकाचा उल्लेख करतात. (३.२९.२१) अह सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थितः सदा 'भगवंत सर्व जीवांमध्ये उपस्थित आहेत' या विशिष्ट श्लोकाचे तात्पर्य आपण, श्रीकृष्णांचा उपहास करणा-या अनधिकृत व्यक्तींच्या भाष्यावरून समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्यांकडून समजून घेतले पाहिजे. या श्लोकावर भाष्य करताना जीव गोस्वामी म्हणतात, श्रीकृष्ण आपल्या परमात्मा विभूतीद्वारे संपूर्ण चराचर प्राणिमात्रांमध्ये स्थित आहेत. म्हणून जो नवसाधक केवळ मंदिरातल्या भगवंतांच्या अर्च-विग्रहाची आराधना करतो, पण इतर जीवांचा आदर करीत नाही, तो व्यर्थच मंदिरातील विग्रहाची आराधना करीत आहे. भगवदभक्तांचे तीन प्रकार असतात आणि यामध्ये नवसाधक हा खालच्या स्तरातील भक्त होय. नवसाधक हा इतर भक्तांपेक्षा मंदिरातील मूर्तीचा अधिक आदर करतो, म्हणून विश्वनाथ चक्रवती ठाकूर आपल्याला बजावतात की, आपण आपली ही वृत्ती सुधारली पाहिजे. भक्ताने पाहिले पाहिजे की, श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्यामुळे प्रत्येक शरीर हे भगवंतांच्या मंदिराप्रमाणे आहे. म्हणून ज्या प्रकारे मनुष्य भगवंतांच्या मंदिराला अभिवादन करतो त्याप्रमाणे परमात्मा वास करणा-या प्रत्येक देहाचा त्याने योग्य आदर केला पाहिजे. म्हणून कोणाचीही उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य आदर आणि सन्मान केला पाहिजे.
असेही अनेक निर्विशेषवादी आहेत जे मंदिरातील पूजा-अर्चनेचा उपहास करतात. ते म्हणतात की, जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच का आराधना करावी? परंतु जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीत का? निर्विशेषवादी आणि सविशेषवादी जरी एकमेकांबरोबर नित्य वाद घालीत बसले तरी परिपूर्ण कृष्णभावनाभावित भक्त जाणतो की, ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत. गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करीत असले तरी, आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तींद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित असतात.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com