वेदाबेस​

अध्याय नववा

राजविद्या राजगृह्ययोग(परमगोपनीय ज्ञान)

श्लोक 1: श्रीभगवान म्हणाले: हे अर्जुना! तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने, मी तुला हे परमगोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील.

श्लोक 2: सर्व गोपनीय ज्ञानांत अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे.

श्लोक 3: हे परंतप अर्जुना! ज्यांची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म-मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते.

श्लोक 4: मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही.

श्लोक 5: तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पाहा! जरी सर्व जीवांचा पालनपोषणकर्ता आणि सर्वव्यापी मी आहे तरीसुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे.

श्लोक 6: ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण.

श्लोक 7: हे कौतेया! कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी, माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो.

श्लोक 8: संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुनः पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो.

श्लोक 9: हे धनंजया! ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो.

श्लोक 10: हे कोंतेया! माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो.

श्लोक 11: जेव्हा मी मानवसदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत.

श्लोक 12: याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये, त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते.

श्लोक 13: हे पार्थ! मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी, पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून जाणतात.

श्लोक 14: हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करीत, दृढनिश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात.

श्लोक 15: इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकमेवाद्वितीय रूपामध्ये, विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात.

श्लोक 16: परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ, पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे. तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे.

श्लोक 17: मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धिकर्ता आणि ॐकार आहे. तसेच, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे.

श्लोक 18: मीच ध्येय, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे.

श्लोक 19: हे अर्जुना! मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवितोही, मी अमृततत्त्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत्(चेतन) आणि असत्(जड पदार्थ) दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत.

श्लोक 20: वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात.

श्लोक 21: याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषयसुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्युलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे (सिद्धांताचे) पालन करून जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात, त्यांना पुनः पुन्हा केवळ जन्म-मृत्यूच्या चक्रात पडावे लागते.

श्लोक 22: परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.

श्लोक 23: हे कोंतेया! जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते.

श्लोक 24: सर्व यज्ञांचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्त्वतः जाणत नाहीत त्यांचे पतन होते.

श्लोक 25: जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो, जे पितरांची उपासना करतात, ते पितरांकडे जातात, जे भूतांची उपासना करतात, त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात.

श्लोक 26: जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो.

श्लोक 27: हे कौंतेया! तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर

श्लोक 28: याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. या संन्यासयोगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील.

श्लोक 29: मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे.

श्लोक 30: जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो.

श्लोक 31: तो लौकरच धर्मात्मा (सदाचारी) होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते, हे कोंतेय! निर्भय हो आणि घोषणा कर की, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.

श्लोक 32: हे पार्था! जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील, स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात.

श्लोक 33: तर मग सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजर्षीबद्दल काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो.

श्लोक 34: आपले मन, सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com