अध्याय सहावा
ध्यानयोग
श्लोक 1: श्रीभगवान म्हणाले: जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय, पण जो अग्निहोत्रादिक कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगीसुद्धा नाही.
श्लोक 2: हे पांडुपुत्रा! ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रियतृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाही.
श्लोक 3: जो अष्टांगयोगामध्ये नवसाधक आहे, त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते.
श्लोक 4: जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रियतृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मांमध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते.
श्लोक 5: मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वत:ची अधोगती होऊ न देतात, स्वत:चा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे.
श्लोक 6: ज्याने मनाला जिंकले आहे, त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे; परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे मन हे परम शत्रू असते.
श्लोक 7: ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्तच झालेला असतो. त्याने शांती प्राप्त केलेली असते. अशा मनुष्यासाठी सुख आणि दु:ख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान, सर्व काही सारखेच असते.
श्लोक 8: मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कारायोगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो.
श्लोक 9: मनुष्य जेव्हा प्रमाणिक हितचिंतक, सुहृदय, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो, तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो.
श्लोक 10: योगी व्यक्तींने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांतस्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे.
श्लोक 11-12: योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांतस्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये तसेच आसन पवित्रस्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसानावर दृढतापूर्वक बसावे आणि मन,इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा.
श्लोक 13-14: मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलीत आणि संयमित मनाने भयरहित होऊन, कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे.
श्लोक 15: याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून, मन संयमित झालेला योगी, भौतिक जीवनाचा लय करून भगवद्धामाची (श्रीकृष्णांचे निवास) प्राप्ती करतो.
श्लोक 16: हे अर्जुना! जो अत्यधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही.
श्लोक 17: जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसरिक दु:खांचे निदान करू शकतो.
श्लोक 18: योगाभ्यासद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते.
श्लोक 19: जेथे वार्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो.
श्लोक 20-23: योगाभ्यासामुळे मनुष्याचे मन जेव्हा सांसरिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते, तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की, यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर, सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर, याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणार्या दु:खापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे.
श्लोक 24: मनुष्याने दृढ निश्चियाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योगमार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे.
श्लोक 25: हळूहळू, क्रमश: दृढविश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये.
श्लोक 26: आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे.
श्लोक 27: ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे, त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजोगुणाच्या पलीकडे असतो, त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरुपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्वकर्माफलांपासून मुक्त होतो.
श्लोक 28: याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषांतून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये, परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो.
श्लोक 29: वास्तविक योगी, सर्व प्राणिमात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणिमात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निःसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला (भगवंतांना) सर्वत्र पाहते. तात्पर्य:
श्लोक 30: जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही.
श्लोक 31: जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो, तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो.
श्लोक 32: हे अर्जुन! जो आपल्या स्वतःच्या तुलनेने, सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये, वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय.
श्लोक 33: अर्जुन म्हणाला: हे मधुसूदन! तुम्ही सांगितलेली योगपद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे.
श्लोक 34: हे कृष्ण! मन हे चंचल, उच्छंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते.
श्लोक 35: भगवान श्रीकृष्ण म्हणाले: हे महाबाहू कौंतेया ! चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत कठीण आहे; पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे.
श्लोक 36: ज्याचे मन उच्छुखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे; परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे.
श्लोक 37: अर्जुन म्हणाला: हे कृष्ण! जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो; परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते?
श्लोक 38: हे महाबाहो कृष्ण! ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्नविच्छित्र ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना?
श्लोक 39: हे कृष्ण! माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्यावाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही.
श्लोक 40: श्रीभगवान म्हणाले: हे पार्था ! शुभकार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही.
श्लोक 41: योगभ्रष्ट योगी, पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो.
श्लोक 42: अथवा (दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला) तो, अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे.
श्लोक 43: हे कुरुनंदन! असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो.
श्लोक 44: आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्रांच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो.
श्लोक 45: आणि जेव्हा योगी, सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा अन्ततः अनेकानेक जन्मजन्मान्तराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते.
श्लोक 46: योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना! तू सर्व परिस्थितीत योगी हो.
श्लोक 47: आणि सर्व योग्यांमध्ये, जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो; तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com