वेदाबेस​

अध्याय तिसरा

कर्मयोग

श्लोक 1: अर्जुन म्हणाला: हे जनार्दन! हे केशव! जर तुम्हाला वाटते की, बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात?

श्लोक 2: तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे. म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा.

श्लोक 3: श्रीभगवान म्हणाले: हे निष्पाप अर्जुना! मी यापूर्वीच सांगितले आहे की, आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. काहीजणांचा तात्त्विक तर्काद्वारे अर्थात, ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो.

श्लोक 4: केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही तसेच केवळ संन्यासनेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही.

श्लोक 5: प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असाहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते, म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही.

श्लोक 6: जो कर्मेंद्रिये संयमित करतो, परंतु ज्याचे मन इंद्रियविषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वत:ची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते.

श्लोक 7: याउलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियाना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा (कृष्णभावनाभावित) प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे.

श्लोक 8: तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्यावाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही.

श्लोक 9: श्रीविष्णूंप्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया! तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्रीविष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील.

श्लोक 10: सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्रीविष्णुंप्रीत्यर्थ, यज्ञसहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की,‘‘तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील.’’

श्लोक 11: यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने, सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल.

श्लोक 12: विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील, पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे.

श्लोक 13: भगवद्‌भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात. कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वत:च्या इंद्रियभोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात.

श्लोक 14: सर्व प्राणिमात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसातून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो.

श्लोक 15: वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्‍वतरीत्या स्थित झाले आहे

श्लोक 16: हे पार्थ! जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्यजीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रियतृप्तीकरिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते.

श्लोक 17: पण जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही.

श्लोक 18: आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते, त्याचबरोबर इतर प्राणिमात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते.

श्लोक 19: म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्‍वरप्राप्ती होते.

श्लोक 20: जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली. म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म केले पाहिजे.

श्लोक 21: श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्यजन करतात; आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते.

श्लोक 22: हे पार्थ! या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही, मला कशाची उणीव नाही तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो.

श्लोक 23: कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ! सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील.

श्लोक 24: मी जर नियम कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन.

श्लोक 25: ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुषयाने अनासक्त होऊन कर्म करावे.

श्लोक 26: नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना (कृष्णभावनेच्या यथावकाश विकासासाठी) सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे.

श्लोक 27: मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वत:लाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्मे केली जातात.

श्लोक 28: हे महाबाहू अर्जुन! ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रियतृप्तीमध्ये रममाण होत नाही कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो.

श्लोक 29: भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मांत पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात, पण असे कर्म करणार्‍यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये.

श्लोक 30: म्हणून हे अर्जुन! माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन, मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर.

श्लोक 31: जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात.

श्लोक 32: परंतु जे द्वेषभावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे.

श्लोक 33: ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वत:च्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येकजण तीन गुणाद्वांरे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे?

श्लोक 34: इंद्रिय आणि इंद्रियविषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत.

श्लोक 35: इतरांच्या कर्मांचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वत:च्या नियत कर्माचे, दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वत:चे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचवे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते.

श्लोक 36: अर्जुन म्हणाला: हे वृष्णिवंशजा! कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच, पापकर्मे करण्यास प्रेरित होतो?

श्लोक 37: श्रीभगवान म्हणाले:हे अर्जुना! रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रुपांतरित होतो, तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे.

श्लोक 38: ज्याप्रमाणे धूराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टिला जातो त्याचप्रमाणे जीव, या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो.

श्लोक 39: याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरुपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत असतो.

श्लोक 40: इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो.

श्लोक 41: म्हणून हे भरतर्षभ अर्जुन! इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा (काम) प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर.

श्लोक 42: कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीमध्ये श्रेष्ठ आहेत, मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो (आत्मा) बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे.

श्लोक 43: याप्रमाणे आपण स्वत: भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून, हे महाबाहो अर्जुन! मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे (कृष्णभावना) मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरुपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com