वेदाबेस​

श्लोक 8 . 14

अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश: ।
तस्याहं सुलभ: पार्थ नित्ययुक्तस्य योगिन: ॥ १४ ॥
ananya-cetāḥ satataṁ
yo māṁ smarati nityaśaḥ
tasyāhaṁ su-labhaḥ pārtha
nitya-yuktasya yoginaḥ

शब्दार्थ

अनन्य-चेताः-अविचलित मनाने; सततम्-सतत; यः-जो; माम्—माझे (श्रीकृष्ण); स्मरति— स्मरण करतोः नित्यशः-नियमितपणे; तस्य—त्याला; अहम्—मीः सु-लभः—प्राप्त होण्यास अत्यंत सुलभ; पार्थ-हे पार्था; नित्य-नियमितपणे; युक्तस्य-युक्त असलेल्या; योगिन:- भक्तासाठी

भाषांतर

हे पार्था!जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो, त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो. कारण, तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो.

तात्पर्य

भक्तियोगाद्वारे भगवंतांची सेवा करणा-या अन्नय विशुद्ध भक्तांना, कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते, याचे वर्णन विशेषकरून या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये चार निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांचा-आर्त, जिज्ञासू, अथार्थी आणि ज्ञानीउल्लेख करण्यात आला आहे. मोक्षप्राप्तीच्या निरनिराळ्या योगपद्धतींचेही-कर्मयोग, ज्ञानयोग आणि हठयोग-वर्णन करण्यात आले आहे. या योगपद्धतींमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो; परंतु या श्लोकामध्ये विशेषकरून विशुद्ध भक्तियोगाचा ज्ञान, कर्म आणि हठ यांच्या मिश्रणारहित उल्लेख करण्यात आला आहे. अनन्य चेत: शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते. त्याला स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा नसते, तसेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची किंवा भौतिक जंजाळातून मोक्षप्राप्ती करण्याचीही इच्छा नसते. विशुद्ध भक्ताला कशाचीही अभिलाषा नसते. चैतन्य चरितामृतात शुद्ध भक्ताला निष्काम म्हटले आहे. अर्थात त्याला स्वार्थतृप्तीचीही इच्छा नसते. परिपूर्ण शांती केवळ त्यालाच प्राप्त होते आणि जे स्वार्थहेतूने प्रेरित झालेले असतात त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही. ज्ञानयोगी, कर्मयोगी किंवा हठयोगीला थोडयाफार प्रमाणात स्वार्थ असते, परंतु शुद्ध भक्ताची भगवंतांना संतुष्ट करण्याव्यतिरिक्त इतर काहीच अभिलाषा नसते. म्हणून भगवंत सांगतात की, ज्यांची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना सहजपणे भगवत्प्राप्ती होते.

शुद्ध भक्त श्रीकृष्णांच्या अनेक रूपांपैकी एका रूपाची भक्ती करण्यामध्ये सदैव युक्त झालेला असतो. श्रीकृष्णांची राम आणि नृसिंहासारखे विविध विस्तारित रूपे, अंश आणि अवतार आहेत आणि भगवंतांच्या या दिव्य रूपांपैकी कोणत्याही रूपावर भक्तिभावाने भक्त आपले मन एकाग्र करू शकतो. इतर योगांचा अभ्यास करणा-या साधकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या अशा भक्तापुढे निर्माण होत नाहीत. भक्तियोग हा अत्यंत सहज, उदात्त आणि आचरण करण्यासाठी सुलभ आहे. भक्तियोगाचा प्रारंभ केवळ हरे कृष्ण जपाने होऊ शकतो. भगवंत हे सर्वांवर कृपा करतात; परंतु पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे, विचलित न होता जो त्यांची सदैव सेवा करतो त्यांच्यावर ते विशेष कृपा करतात. अशा भक्ताला ते विविध प्रकारे साहाय्य करतात. वेदांमध्ये (कठोपनिषद् १.२.२३) सांगितल्याप्रमाणे यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् –'जो पूर्णपणे शरणागत आहे आणि भगवद्भक्तीमध्ये युक्त झालेला आहे तो भगवंतांना यथार्थ रूपामध्ये जाणू शकतो. आणि भगवद्गीतेत (१०.१०) सांगितल्याप्रमाणे ददामि बुद्धियोगांतमू-भगवंत अशा भक्ताला पुरेशी बुद्धी देतात, जेणेकरून भगवद्धामामध्ये त्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल.

विशुद्ध भक्ताचा विशेष गुण म्हणजे, तो विचलित न होता आणि देश, काल, परिस्थितीचा विचार न करता सदैव श्रीकृष्णांचे स्मरण करीत असतो. त्याच्या भगवत् स्मरणामध्ये कोणतीच विघ्ने येत नाहीत. तो आपली सेवा कोणत्याही काळी आणि स्थळी करू शकतो. काहीजण म्हणतात की, भक्ताने वृंदावनादी पवित्र तीर्थस्थळी किंवा भगवंतांच्या लीला स्थळी वास केला.पाहिजे. तथापि, शुद्ध भक्त हा कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो. श्रीअद्वैताचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितले की, 'हे भगवन्! जेथे जेथे तुम्ही आहात तेथे तेथे वृंदावन आहे.'

सततम् आणि नित्यश: या शब्दांवरून दर्शविल्याप्रमाणे शुद्ध भक्त हा सदैव कृष्ण स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांवर ध्यान करीत असतो. ज्याला भगवंतांची अत्यंत सुलभतेने प्राप्ती होते अशा शुद्ध भक्ताचे हे विशेष गुण आहेत. गीता ही भक्तियोगाच्या महत्त्वावर इतर कोणत्याही योगापेक्षा अधिक जोर देते. सामान्यत: भक्तियोगी पाच प्रकारे भक्ती करतात (१)शांत भक्त, (२)दास्य भक्त, (३)साख्य भक्त, (४)वात्सल्य भक्त आणि (५)माधुर्य भक्त. यांपैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करणारा योगी असो, तो अविरतपणे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो आणि क्षणासाठीही तो भगवंतांना विसरू शकत नाही. यास्तव त्याला सहजपणे भगवंतांची प्राप्ती होते. एक शुद्ध भक्त क्षणभरासाठीही भगवंतांना विसरू शकत नाही आणि त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठीही विसरू शकत नाहीत. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे /या महामंत्राच्या कीर्तनाच्या कृष्णभावनामृत पद्धतीचे हे मोठे वरदानच आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com