वेदाबेस​

श्लोक 7 . 19

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ॥ १९ ॥
bahūnāṁ janmanām ante
jñānavān māṁ prapadyate
vāsudevaḥ sarvam iti
sa mahātmā su-durlabhaḥ

शब्दार्थ

बहूनाम्--अनेक; जन्मनाम्-पुनः पुन्हा जन्म आणि मृत्यू: अन्ते—नंतर, अंती; ज्ञान-वान्-ज्ञानी; माम्-मला; प्रपद्यते-शरण येतो; वासुदेवः-भगवान श्रीकृष्णः सर्वम्-सर्वः इति—याप्रमाणे; सः-तो; महा-आत्मा-महात्मा; सु-दुर्लभः-अत्यंत दुर्लभ.

भाषांतर

अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो, मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परमकारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो.

तात्पर्य

अनेकानेक जन्मानंतर, भक्तीपूर्ण सेवा किंवा दिव्य अनुष्ठाने करताना जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष्य असल्याचे दिव्य, विशुद्ध ज्ञान होऊ शकते व त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो. आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभावस्थेमध्ये, मनुष्य जेव्हा भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा निर्विशेषवादाकडे त्याचा थोडासा कल असतो; परंतु जेव्हा तो अधिक प्रगती करतो तेव्हा तो जाणू शकतो की, आध्यात्मिक जीवनातही कर्म करणे आवश्यक असते व हे कर्म म्हणजेच भक्तीपूर्ण सेवा होय. याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतांवर आसक्त होतो आणि त्यांना शरण जातो. अशा वेळी त्याला समजू शकते की, भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजेच सर्वस्व आहे, तेच सर्व कारणांचे मूळ कारण आहेत आणि ही प्राकृत सृष्टी त्यांच्यापासून स्वतंत्र नाही. भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्यतेचे विकृत प्रतिबिंब आहे आणि प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे, याचा त्याला असा साक्षात्कार होतो. याप्रमाणे तो सर्व गोष्टी वासुदेव किंवा श्रीकृष्णांशी संबंधित पाहतो. अशी वासुदेवमयी सर्वव्यापी दृष्टी झाल्यावर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परमलक्ष्य मानून पूर्णपणे शरण जातो. असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात.

या श्लोकाचे विवरण श्वेताश्वतरोपनिषदाच्या (३.१४–१५) तिस-या अध्यायात अति सुंदर रीतीने करण्यात आले आहे.

sahasra-śīrṣā puruṣaḥ
sahasrākṣaḥ sahasra-pāt
sa bhūmiṁ viśvato vṛtvā-
tyātiṣṭhad daśāṅgulam
 
puruṣa evedaṁ sarvaṁ
yad bhūtaṁ yac ca bhavyam
utāmṛtatvasyeśāno
yad annenātirohati

छांदोग्य उपनिषदात (५.१.१५) सांगण्यात आले आहे की, न वें वाची न चक्षुषि न श्रोत्राणि न मनांसीत्याचक्षते प्राण इति एवाचक्षते प्राणो ह्येवैतानि सर्वाणि भवन्ति -‘‘ मनुष्याच्या देहामधील बोलण्याची शक्ती पाहण्याची शक्ती, ऐकण्याची शक्तती किंवा विचार करण्याची शक्ती, यांपैकी कोणतीही शक्ती प्रधान नाही, जीवन किंवा चेतना हीच सर्व कार्यांचे केंद्रबिंदू आहे.' त्याचप्रमाणे श्री वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींमधील प्रधान तत्त्व आहे. या देहामध्ये बोलण्याची शक्ती ऐकण्याची शक्ती, मानसिक कार्य करण्याची शक्ती इत्यादी शक्ती आहेत, पण या शक्ती जर भगवंतांशी संबंधित नसतील तर त्यांना काहीच महत्त्व नाही. वासुदेव हे सर्वव्यापी आणि सर्व काही असल्यामुळे, भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो. (संदर्भ -श्रीमद्भगवद्गीता ७.१७ आणि ११.४०)

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com