वेदाबेस​

श्लोक 7 . 15

न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ॥ १५ ॥
-

शब्दार्थ

न-नाही; माम्-मला; दुष्कृतिनः-दुष्ट; मूढाः-मूर्खं; प्रपद्यन्ते-शरण येतात; नर-अधमाः-नराधम, मनुष्यातील अधम; मायया-मायेद्वारे; अपहृत-अपहरण केलेले, नष्ट झालेले; ज्ञाना:- ज्याचे ज्ञान; आसुरम्-आसुरी; भावम्-प्रकृती; आश्रिताः-धारण करणारे.

भाषांतर

जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत.

तात्पर्य

श्रीमद्भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की, केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांतून पार होऊ शकतो. या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो की, जर असे असेल तर सुशिक्षित तत्वज्ञानी वैज्ञानिक, व्यावसायिक, राज्यकर्ते आणि सामान्य लोकांचे पुढारी हे सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण का जात नाहीत? भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानवजातीचे पुढारी, विविध प्रकारे, अनेकानेक जन्मांमध्ये दृढ योजनाबद्ध आणि खडतर प्रयत्न करीत आहेत. परंतु जर भगवान श्रीकृष्णांच्या केवळ चरणकमलांना शरण गेल्यने मुक्ती प्राप्त होत असेल तर मग हे बुद्धिमान आणि परिश्रम करणारे लोक या सुगम मार्गाचा अंगीकार का करीत नाहीत?

गीतेमध्ये या प्रश्नांचे उत्तर स्पष्टपणे देण्यात आले आहे. ब्रह्मदेव, शिव, कपिल, चतुष्कुमार, मनू, व्यास, देवल, असित, जनक, प्रहाद, बली आणि त्यानंतर मध्वाचार्य, रामानुजाचार्य, श्री चैतन्य महाप्रभू यांसारखे समाजातील खरोखरी विद्वान पुढारी आणि इतर अनेक तत्वज्ञानी, राजकारणी आचार्य, वैज्ञानिक इत्यादी सर्वशक्तिमान भगवंतांच्या चरणकमलांना शरण गेलो आहेत. जे भोंदू आणि ढोंगी आहेत व भौतिक लाभप्राप्तीकरिता आपण वैज्ञानिक, तत्वज्ञानी, शिक्षक, शासक इत्यादी असल्याचे दर्शवितात ते भगवद्भक्तीचा मार्ग स्वीकारीत नाहीत. त्यांना भगवंतांबद्दल मुळीच कल्पना नसते. ते स्वत:च आपल्या सांसारिक योजना बनवितात आणि म्हणून भौतिक जीवनातील समस्या सोडविण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्यांच्या समस्या अधिकच जटील बनतात. परंतु प्रकृती ही इतकी शक्तिशाली आहे की, ती नास्तिकांच्या अनधिकृत योजनांचा प्रतिकार करू शकते आणि योजना आयोगांच्या योजना उधळून लावू शकते.

या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृतिनः किंवा दुष्ट या शब्दात करण्यात आले आहे. ज्याने पुण्यकर्म केले आहे त्याला कृति असे म्हटले जाते. विविध योजना करणारे नास्तिकही कधीकधी अत्यंत बुद्धिमान आणि पुण्यात्मेही असतात, कारण कोणतीही प्रचंड, चांगली अथवा वाईट योजना असो, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धीची आवश्यकता ही असतेच, परंतु भगवंतांच्या योजनांना विरोध करण्यासाठी नास्तिक आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग करीत असल्यामुळे अशा नास्तिक आयोजकांना दुष्कृति असे म्हटले आहे. दुष्कृती हा शब्द दर्शवितो की, नास्तिकाची बुद्धी आणि प्रयत्न हे चुकीच्या दिशेने होत आहेत.

गीतेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात. ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या हालचालीनुसार त्या पदार्थाची छाया हालचाल करते त्याचप्रमाणे भौतिक शक्तीही कार्य करते, परंतु तरीही भौतिक शक्ती ही अत्यंत बलशाली आहे आणि नास्तिकवादी आपल्या निरीश्वरवादी वृत्तीमुळे प्रकृती कशा रीतीने कार्य करीत असते किंवा भगवंताच्या योजना काय आहेत हे जाणू शकत नाही. रज तसेच तमोगुणाच्या प्रभावामुळे नास्तिकवाद्यांच्या सर्व योजना निष्फळच ठरतात. उदाहरणार्थ हिरण्यकशिपू आणि रावण, हे दोघेही भौतिकदृष्ट्या विद्वान, तत्वज्ञानी, वैज्ञानिक, शासक आणि शिक्षक होते; परंतु त्यांच्या सर्व योजना धुळीत मिळाल्या. या दुष्कृतिन: किंवा दुष्ट लोकांचे पुढीलप्रमाणे चार प्रकार असतात.

(१)मूढः- हे लोक भारवाहक कष्टाळू जनावराप्रमाणे अतिशय मूख असतात. त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगावयाची इच्छा असते म्हणून ते भगवंतांना कर्मफल अर्पण करू इच्छित नाहीत. ओझेकरी जनावरांचे नमुनेदार उदाहरण म्हणजे गाढव. या गरीब जनावराला त्याचा मालक अतिशय कष्ट करावयास भाग पाडतो. गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी काबाडकष्ट करीत आहोत हे माहीत नसते. थोडेफार गवत खाऊन आपले पोट भरण्यातच तो समाधानी राहतो. मालक आपल्याला मारील या भीतीने तो थोडा वेळ झोपतो आणि गाढविणीच्या लाथा वारंवार खात आपली कामवासना तृप्त करतो. कधीकधी तो कविता आणि तत्वज्ञान गातो; परंतु त्याच्या कर्कश ओरडण्याने इतरांना मात्र त्रासच होतो. सकाम कर्मे करणा-या मूखांची अशी स्थिती असते, कारण आपण कुणासाठी कर्म केले पाहिजे याचे त्याला ज्ञान नसते. कर्म हे यज्ञाप्रीत्यर्थ असल्याचे त्याला माहीत नसते.

ब-याचदा, स्वयंनिर्मित कामाचे ओझे कमी करण्याकरिता जे लोक दिवसरात्र अत्यंत काबाडकष्ट करीत असतात ते असे म्हणताना आढळतात की, जीवाच्या स्वरूपस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच वेळ नाही. अशा मूढ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजेच जीवनाचे सर्वस्व असते, परंतु वस्तुत: आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात. कधीकधी भौतिक लाभाकरिता ते दिवसरात्र झोपेवाचून घालवितात आणि जर त्यांना उदरव्रण झालेला असेल किंवा अपचन झाले असेल तर ते प्रायः काही अन्न न खाण्यातच समाधान मानतात. आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरिता ते दिवसरात्र केवळ काबाडकष्ट करण्यात मग्न असतात. आपल्या ख-या मालकाविषयी अज्ञान असल्यामुळे सकाम कर्मी, धनलोभीची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ दवडतात. दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतींचे परमअधिपती, भगवंतांना कधीच शरण जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल योग्य व्यक्तींकडून श्रवण करण्यास वेळही काढत नाहीत. विष्ठा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून बनविलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाही. त्याचप्रमाणे मूख कर्मी मनुष्य, भौतिक जगाला चालना देणा-या शाश्वत चेतन तत्त्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो.

(२) दुसरा जो 'दुष्कृतिनः' अर्थात, दुष्ट लोकांचा प्रकार आहे त्यांना नराधम किंवा मनुष्यांतील सर्वांत नीच मनुष्य असे म्हणतात. नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय. जीवाच्या चौ-यांशी लाख योनींपैकी चार लाख मनुष्ययोनी आहेत; यांपैकी अनेक नीच मनुष्ययोनी आहेत व त्यातील बहुतेक सर्वजण असंस्कृत असतात. ज्यांच्यासाठी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विधिविधाने आहेत त्या म्हणजे सुसंस्कृत योनी होत, ज्यांचा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या विकास झाला आहे, परंतु ज्यांना धर्मतत्वे नाहीत ते नराधम समजले जातात. तसेच धर्म, भगवत्-विहीन धर्म असू शकत नाही, कारण परम सत्याला जाणणे आणि मनुष्यांचा भगवंतांशी असणारा संबंध जाणणे हाच धर्मतत्त्वांचे पालन करण्यामागचा उद्देश असतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे अन्य कोणतेही प्रमाण नाही आणि मीच परत सत्य आहे. मनुष्याने सर्वशक्तिमान, परम सत्य भगवान श्रीकृष्णांशी असणा-या आपल्या विस्मृत शाश्वत संबंधाचे पुनरुज्जीवन करणे हा सुसंस्कृत मनुष्यजीवनाचा उद्देश आहे. जो कोणी ही संधी गमावतो त्याला नराधम म्हणण्यात येते. शास्त्रांमधून आपल्याला कळून येते की, जेव्हा मूल मातेच्या गर्भाशयात (अत्यंत असाहाय्य अवस्थेत) असते तेव्हा ते स्वतःच्या सुटकेकरिता प्रार्थना करते आणि गर्भाशयातून बाहेर येताच आपण केवळ भगवंतांचीच सेवा करू असे वचन देते. जेव्हा मनुष्य संकटात असतो, तेव्हा त्याने भगवंतांची प्रार्थना करणे हे स्वाभाविकच आहे, कारण जीवाचा भगवंतांशी नित्य संबंध असतो आणि प्रसूती झाल्यानंतर मूल मायाशक्तीच्या प्रभावाने, जन्मावेळी झालेल्या वेदना तसेच त्याच्या उद्धारकर्त्यालाही विसरते.

मुलांमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दिव्य चेतनेची पुनर्जागृती करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. धर्मसंहिता असणा-या मनुस्मृतीनुसार, वर्णाश्रम पद्धतीमध्ये भगवद्भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दहा संस्काराच्या किंवा शुद्धीकरणाच्या विधी आहेत. तथापि, जगातल्या कोणत्याही भागात, कोणत्याही विधींचे पालन केले जात नाही. म्हणूनच ९९.९% लोक हे नराधम आहेत.

जेव्हा सारे लोक नराधम होतात तेव्हा स्वाभाविकपणे त्याचे संपूर्ण तथाकथित शिक्षण हे बलशाली भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते. गीतेतील आदर्शानुसार, ब्राह्मण, कुत्रा, गाय, हत्ती आणि चांडाळाला समभावाने पाहतो तोच ख-या अर्थाने विद्वान मनुष्य होय. तीच शुद्ध भक्ताची दृष्टी असते. भगवंतांचे अवतार असणारे आद्य गुरू श्री नित्यानंद प्रभू यांनी, जगाई, मधाई या नराधम भावांचा उद्धार केला आणि अत्यंत नीच मनुष्यालाही शुद्ध भक्ताची कृपा कशा प्रकारे प्राप्त होते हे दाखवून दिले. म्हणून भगवंतांनी निंद्य ठरविलेला नराधम, केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेनेच आपली आध्यात्मिक भावना पुनर्जागृत करू शकतो.

भागवत धर्माचा प्रसार करताना श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केला आहे की, लोकांनी भगवंतांच्या संदेशाचे नम्रपणे श्रवण केले पाहिजे आणि या उपदेशाचे सार म्हणजेच श्रीमद्‌भागवद्‌गीता होय. अत्यंत नीच आणि नराधमांनाचाही केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे उद्धार होऊ शकतो; परंतु दुर्दैवाने ते या उपदेशांचे श्रवण करणेही नाकारतात. तेव्हा भगवंतांच्या इच्छेला शरण जाणे तर दूरच राहिले. या प्रकारे हे नराधम मानवाच्या प्रमुख कर्तव्याची पूर्णपणे उपेक्षा करतात.

(३)दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे माययापहृतज्ञाना: होय. अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान मायाशक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते. हे लोक प्रायः अत्यंत विद्वान म्हणजे मोठमोठे तत्त्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक इत्यादी असतात; परंतु माया यंची दिशाभूल करते म्हणून ते भगवंतांची अवज्ञा करतात.

सद्यस्थितीत मायायापहृतज्ञाना: असे पुष्कळ लोक, गीतेच्या अभ्यासक पंडितांमध्ये सुदधा आहेत. गीतेमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे की, श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, त्यांच्याबरोबरीचा किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. भगवंत हे सर्व मनुष्यप्राण्यांच्या जन्मदात्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत. श्रीकृष्ण हे केवळ ब्रह्मदेवाचेच पिता आहेत असे नाही तर ते सर्व योनींचेही बीजधारक पिता आहेत. निर्विशेष ब्रह्मज्योतीचा उगम त्यांच्यापासूनच होतो आणि सर्व जीव, अंतर्यामी असणारे परमात्मा ही त्यांचीच विस्तारित रूपे आहेत. भगवंत सर्व पदार्थाचे मूलस्रोत आहेत आणि म्हणून प्रत्येकाने त्यांच्या चरणकमलांना शरण गेले पाहिजे. असे स्पष्ट आदेश असतानाही मायायापहृतज्ञाना: लोक भगवंतांचा अवमान करतात आणि भगवंत हे केवळ एक सामान्य मनुष्य आहेत असे समजतात. ते जाणत नाहीत की, हा भाग्यशाली मनुष्य देह भगवंतांच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे.

माययापहृतज्ञाना: लोकांनी केलेली गीतेवरील परंपरारहित अनधिकृत भाष्ये आध्यात्मिक मार्गावरील अनेक अडथळेच आहेत. हे भ्रांत भाष्यकार श्रीकृष्णांना शरण जात नाहीत किंवा ते इतरांनाही शरण जाण्यास शिकवीत नाहीत.

(४) दुष्कृती लोकांचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे आसुरम् भावम् आश्रिता: किंवा आसुरी वृत्तीचे लोक होय. हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात. त्यांच्यापैकी काहीजण असा युक्तिवाद करतात की, भगवंत या भौतिक जगतात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाहीत, परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत. यांच्यापैकीच इतर, भगवंत हे निर्विशेष ब्रह्मज्योतीहून गौण आहेत असे मानतात, पण गीतेत तर याउलट सांगण्यात आले आहे. नास्तिकवादी हे भगवंतांचा द्वेष करीत असल्याने, अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना ते प्रस्तुत करतात. भगवंतांचा तिरस्कार करणे हेच अशा लोकांच्या जीवनाचे ध्येय असल्याने, ते श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेऊ शकत नाहीत.

दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अल्बन्दरू म्हणतात की, 'हे भगवन्! तुमचे गुण, रूप आणि लीला दिव्य आहेत. शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित आहात. दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणा-या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांनी तुमचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे, पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञातच आहोत.’’

म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे १. मूढ २. नराधम ३. भ्रमित तर्कवादी आणि ४. नास्तिकवादी, हे लोक, सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरीसुद्धा भगवंतांच्या चरणकमलांना शरण जात नाहीत.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com