वेदाबेस​

श्लोक 7 . 1

श्रीभगवानुवाच
मय्यासक्तमना: पार्थ योगं युञ्जन्मदाश्रय: ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १ ॥
-

शब्दार्थ

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले;मयि-माझ्यामध्ये; आसक्त-मना:-ज्याचे मन आसक्त झाले आहे; पार्थ—हे पृथापुत्र अर्जुन; योगम्—आत्मसाक्षात्कार, युञ्जन्—अभ्यास करीत असता; मत्-आश्रयः-माझ्या भावनेत किंवा कृष्णभावनेत;असंशयम्-निःसंशयपणे; समग्रम्-संपूर्णपणे; माम्-मला; यथा-कसे; ज्ञास्यसि-तू जाणू शकशील; तत्-ते; शृणु-ऐक.

भाषांतर

श्रीभगवान म्हणाले: हे पार्थ! माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे, निःसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक.

तात्पर्य

भगवद्गीतेच्या या सातव्या अध्यायात कृष्णभावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर्य कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे. तसेच या अध्यायात, श्रीकृष्णांवर आसक्त होणा-या चार प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणा-या चार प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचेही वर्णन आहे.

भगवद्गीतेच्या प्रथम सहा अध्यायांत जीवाचे वर्णन, विविध प्रकारच्या योगपद्धतीद्वारे स्वत:ला आत्मसाक्षात्काराप्रत उन्नत करण्याइतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा, असे करण्यात आले आहे. सहाव्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता किंवा दुसर्या शब्दांत सांगावयाचे तर, कृष्णभावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तरच तो परम सत्याला पूर्णपणे जाणू शकतो. निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते. पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णांचे ज्ञान होणे होय आणि कृष्णभावनाभावित व्यक्तीला सर्व गोष्टींच उलगडा होतो. पूर्णपणे कृष्णभावनाभावित मनुष्य जाणतो की, श्रीकृष्‌ण म्हणजेच संशयातीत अशा ज्ञानाची परमावधी आहे. विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्णभावनेच्या पथावरील पाय-या आहेत. जो प्रत्यक्षपणे कृष्णभावनेचा स्वीकार करतो, त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते. कृष्णभावनेच्या योगाभ्यासाद्वारे मनुष्याला परम सत्य, जीव, भौतिक प्रकृती आणि साधनसामग्रीसहित त्यांचे प्राकट्य, या सर्व गोष्टींचे पूर्णपणे ज्ञान होते.

म्हणून मनुष्याने सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, भगवान श्रीकृष्णांच्या ठायी मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते. या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम् सर्वप्रथम आणि महत्वपूर्ण आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की, तच्छृणु म्हणजे माझ्याकडून ऐक. श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्णभावनाभावित होण्याची सुसंधी प्राप्त होते. यास्तव मनुष्याने, शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ आणि घमेंडखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्ताकडून ज्ञान प्राप्त केल पाहिजे.

श्रीमद्भागवतातील प्रथम स्कंधातील, दुस-या अध्यायामध्ये परम सत्य भगवान श्रीकृष्णांना जाणण्याच्या या विधीचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

श्रृण्वतां स्वकथा: कृष्ण: पुण्यश्रवणकीर्तन:।। हृदयन्त: स्थो हृभद्राणि विधुनोति सुहृत्सताम्‌ ।।
 
नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवतसेवया। भगवत्युत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी।।
 
तदा रजस्तोमोभावा: कामलोभादयश्र्च ये। चेत एतैननाविद्धं स्थितं सत्वे प्रसीदति।।
 
एवम्‌ प्रसन्नमनसो भगवद्‌भक्तियोगत:। भगवतत्वविज्ञानं मुक्तसंगस्य जायते।
 
भिद्यते हृदयग्रंथिश्छिद्यन्ते सर्वसंशया:। क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्र्वरे ।।
‘‘वेदांमधून कृष्णकथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजेच पुण्यकर्म आहे आणि जो कृष्णकथा श्रवण करतो त्याला, प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवितात आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात. या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते. भक्त, श्रीमद्भागवतातून किंवा भगवद्भक्ताकडून कृष्णकथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवद्भक्तीवरील निष्ठा दृढ होते. भगवद्भक्तीच्या विकासामुळे मनुष्य, रज आणि तमोगुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो. जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्त्वावस्थेमध्ये स्थित होतो. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत्-तत्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते. याप्रमाणे भक्तियोगामुळे, भौतिक आसक्तीरूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयमू समग्रम् अर्थात, परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो.' (श्रीमद्भागवत् १.२.१७-२१) म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत्-तत्त्व (कृष्णतत्व) जाणू शकतो.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com