वेदाबेस​

श्लोक 5 . 22

ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते ।
आद्यन्तवन्त: कौन्तेय न तेषु रमते बुध: ॥ २२ ॥
ye hi saṁsparśa-jā bhogā
duḥkha-yonaya eva te
ādy-antavantaḥ kaunteya
na teṣu ramate budhaḥ

शब्दार्थ

ये-जे; हि-निश्‍चितच; संस्पर्श-जा:- भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून; भोगा:- भोग; दु:ख--दु:ख; योनया:- मूळ किंवा कारण; एव-निश्चितच; ते-ते; आदि- प्रारंभ; अन्त-शेवट; वन्त: बाध्य असतात; कौन्तेय-हे कुंतिपुत्रा; न-कधीच नाही; तेषु-त्यामध्ये; रमते-रमतो; बुध:- बुद्धिमान मनुष्य

भाषांतर

भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दु:खांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौंतेया! अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही.

तात्पर्य

प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रियसुख उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियेही तात्पुरती असतात. क्षणभंगुर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव, मिथ्या सुखोपभोग करण्यास कसा मान्य करील? पद्मपुराणात सांगण्यात आले आहे की:

ramante yogino ’nante
satyānande cid-ātmani
iti rāma-padenāsau
paraṁ brahmābhidhīyate

‘‘योगिजन परम सत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परमतत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधले जातात.’’

श्रीमद्भागवतातही (5.5.1) सांगितले आहे की:

nāyaṁ deho deha-bhājāṁ nṛ-loke
kaṣṭān kāmān arhate viḍ-bhujāṁ ye
tapo divyaṁ putrakā yena sattvaṁ
śuddhyed yasmād brahma-saukhyaṁ tv anantam

‘‘पुत्रानो ! या मनुष्यजीवनामध्ये असताना इंद्रियसुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही, अशी सुखे शुकरांनाही उपलब्ध आहेत. त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे, जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल.’’

म्हणून जे वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत, ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या इहसुखाकडे आकर्षित होत नाहीत. मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृत इंद्रियसुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक दु:खाच्या जंजाळात पतित होतो.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com