अध्याय पाचवा
कर्मसंन्यासयोग(कृष्णभावनाभावित कर्म)
श्लोक 1: अर्जुन म्हणाला: हे कृष्ण! सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता, या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का?
श्लोक 2: श्रीभगवान म्हणाले:कर्माचा सन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसंन्यासापेक्षाही उत्तम आहे.
श्लोक 3: हे महाबाहो अर्जुना! जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाहीत तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो.
श्लोक 4: केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग (कर्मयोग) हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून (सांख्ययोग) भिन्न आहे असे म्हणतात. जे लोक वस्तुत: ज्ञानी आहेत ते म्हणतात की, या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो, त्याला दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते.
श्लोक 5: जो जाणतोकी, सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवद्भक्तीद्वारे प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्ययोग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय.
श्लोक 6: भगवद्भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो.
श्लोक 7: जो भक्तिपूर्ण कर्म करतो, विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिये संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही.
Text 8-9: दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहात असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठायी नेहमी माहीत असते की वस्तुत: आपण काहीच करीत नाही. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना, तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपपल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वत: त्यांच्यापासून अलिप्त आहे.
श्लोक 10: जो व्यक्ती, कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो, कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही, त्याप्रमाणे पापकर्मांने प्रभावित होत नाही.
श्लोक 11: योगिजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनीसुद्धा, केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात.
श्लोक 12: निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो. कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अपर्ण करतो; परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे तो बद्ध होतो.
श्लोक 13: जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्मन करविता, नऊ द्वारे असलेल्या या नगरात (भौतिक शरीर) सुखाने राहतो.
श्लोक 14: देहरुपी नगराचा स्वामी, देहधारी जीव हा कर्मांची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते.
श्लोक 15: तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत. तथापि, देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात.
श्लोक 16: परंतु, जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते.
श्लोक 17: जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो.
श्लोक 18: विनम्र साधुव्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे, विद्याविनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते.
श्लोक 19: ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात.
श्लोक 20: जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित आहे आणि भगवत्विज्ञान जाणतो तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो.
श्लोक 21: असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रियसुखामध्ये आसक्त होत नाही तर तो स्वत:मध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो
श्लोक 22: भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दु:खांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौंतेया! अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही.
श्लोक 23: वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी, जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगत तो सुखी असतो.
श्लोक 24: ज्याचे सुख अंत:करणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होता आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो.
श्लोक 25: जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासूनच मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात.
श्लोक 26: जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी, आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्यकाळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते.
Text 27-28: सर्व बाह्य इंद्रियविषय रोखून दोन भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून, नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिये आणि बुद्धी संयमित करून, मोक्षप्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो.
श्लोक 29: मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे, हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा, सांसरिक दु:खांपासून शांती प्राप्त करतो.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com