वेदाबेस​

अध्याय चौथा

ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)

श्लोक 1: भगवान श्रीकृष्ण म्हणाले: मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश, मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला.

श्लोक 2: याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले, पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रुपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते.

श्लोक 3: भगवंतांशी असणाऱ्या संबंधीचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस.

श्लोक 4: अर्जुन म्हणाला: सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे?

श्लोक 5: श्रीभगवान म्हणाले: माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत. हे परंतप! मी ते सर्व जन्म आठवू शकतो; पण तू आठवू शकत नाहीस.

श्लोक 6: मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणिमात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो.

श्लोक 7: जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा र्‍हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्या वेळी हे भारता! मी स्वत: अवतीर्ण होतो.

श्लोक 8: भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्मांची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वत: युगायुगात प्रकट होतो.

श्लोक 9: जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना! तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो.

श्लोक 10: आसक्ती, भय आणि क्रोध यांतून मुक्त झालेले, पूर्णपणे मत्परायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे.

श्लोक 11: जे ज्या भावाने मला शरण येतात, त्याला अनुरुप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ! सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात.

श्लोक 12: मनुष्य या जगात सकाम कार्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात, मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते.

श्लोक 13: भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुरुप अशा कर्माला अनुसरुन मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत आणि तू जाणले पाहिजे की, जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे.

श्लोक 14: कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही.

श्लोक 15: प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिह्नांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे.

श्लोक 16: कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्मांचे वर्णन करतो जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील.

श्लोक 17: कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे.

श्लोक 18: जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे.

श्लोक 19: ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रियतृप्तीच्या इच्छेविरहित आहेत, तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. साधुपुरुषांच्या मते, या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल, अग्निरुपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे.

श्लोक 20: आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून, नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा, जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही.

श्लोक 21: असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो, आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही.

श्लोक 22: जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, तो द्वंद्वांपासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही.

श्लोक 23: जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते.

श्लोक 24: कृष्णभावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्‍चितच भगवद्धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांत पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे (ब्रह्मरुप) आहे आणि हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरुपाचीच आहे.

श्लोक 25: काही योगिजन, देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काहीजण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात.

श्लोक 26: यांपैकी काहीजण (विशुद्ध ब्रह्मचारी) श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची, मानसिक संयमरुपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर (नियमन केलेले गृहस्थाश्रमी) इंद्रियविषयांची, इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात.

श्लोक 27: इतर व्यक्ती, ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात, त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रुपाने नियंत्रित मनरुपी अग्नीमध्ये अर्पण करतात.

श्लोक 28: काहीजण कठोर व्रत धारण करून, काहीजण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काहीजण खडतर तपस्या करून, काहीजण अष्टांगयोग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात.

श्लोक 29: याव्यतिरिक्त इतरही लोक आहेत, जे समाधिस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्‍वासोच्छावास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात.

श्लोक 30: यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणाणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मांतून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्टरुपी अमृताची चव घेतल्यामुळे, ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात.

श्लोक 31: हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे?

श्लोक 32: हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील.

श्लोक 33: हे परंतप! केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंतत: हे पार्थ! सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते.

श्लोक 34: आध्यात्मिक गुरुंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्‍न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात. कारण त्यांनी तत्व जाणलेले असते.

श्लोक 35: आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर, तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की, सर्व प्राणिमात्र हे परमात्म्याचे अंश आहेत अर्थात ते माझेच आहेत.

श्लोक 36: तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्यधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरुपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दु:खरुपी महासागर पार करण्यास समर्थ होशील.

श्लोक 37: ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुन! ज्ञानरुप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो.

श्लोक 38: या जगात, दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्यसमयी, स्वत:मध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो.

श्लोक 39: जो श्रद्धवान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत. तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लौकरच प्राप्त होते.

श्लोक 40: परंतु, प्रमाणित शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवद्भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही.

श्लोक 41: आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियोगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया! तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही.

श्लोक 42: म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता ! योगयुक्त होऊन ऊठ आणि युद्ध कर.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com