श्लोक 2 . 2
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यकीर्तिकरमर्जुन ॥ २ ॥
शब्दार्थ
श्री-भगवान उवाच - श्रीभगवान म्हणाले; कुत: -कोठून; त्वा- तुला ; कश्मलम् - अशुद्ध; इदम् - हा शोक; विषमे - या संकटाच्या वेळी; समुपस्थितम् - प्राप्त झाले; अनार्य - ज्यांना जीवनाचे मूल्य कळत नाही अशा व्यक्ती; जुष्टम् - आचारलेले; अस्वर्ग्यम् - जे उच्चतर लोकांत नेत नाहीत; अकीर्ति - दुष्कीर्ती; करम् - कारण; अर्जुन - हे अर्जुन
भाषांतर
पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणाले: हे अर्जुना! तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकांत जाण्यात नाही, तर त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात.
तात्पर्य
‘कृष्ण’ म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख भगवान असाच केला आहे. भगवान रुपाचा साक्षात्कार हा परम सत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे. परम सत्याचा साक्षात्कार तीन अवस्थांमध्ये होतो; निर्विशेष ब्रह्म, सर्वव्यापी आत्मा, परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परम सत्याचे स्वरुप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. श्रीमद्भागवतात (१.२.११) परम सत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आली आहे-
वदन्ति तत्तत्वविदस्तत्त्वं यज्ज्ञानमद्वयम्। ब्रह्मेती परमात्मेति भगवानिति शब्द्यते।।
‘‘परम सत्याचे ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहेत. परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते.’’
ही तीन दिव्य स्वरुपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात. सूर्यालाही विविध प्रकारची तीन स्वरूपे आहेत. उदाहरणार्थ, सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक. जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे; जो सूर्याच्या पृष्ठभागाला जाणतो तो अधिक प्रगतावस्थेमध्ये आहे आणि जो सूर्यलोकामध्येच प्रवेश करतो. तो सर्वश्रेष्ठ आहे. सामान्य विद्यार्थी जे कवेळ सूर्यप्रकाश, त्याचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा देदीप्यमान प्रकाशाचे स्वरूप जाणण्यात समाधान मानतात त्यांची तुलना, परम सत्याच्या केवळ ब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार करू शकतात त्यांच्याशी करता येईल. जो विद्यार्थी आणखी थोड प्रगत आहे तो सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो व त्याची तुलना परम सत्याच्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करणाऱ्यांशी करता येईल आणि जो सूर्यग्रहाच्या अंत:प्रदेशात प्रवेश करू शकतो त्याची तुलना परम सत्याच्या साकार रूपाचा साक्षात्कार करणाऱ्यांशी करता येते. म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परम सत्य या एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परम सत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत. सूर्यप्रकाश, सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून अलग करता येत नसले तरी तीन विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात.
भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण, व्यासदेवांचे पिता, महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे. संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते, असे अनेक लोक आहेत जे अत्यंत श्रीमंत, अत्यंत बलवान, अत्यंत सुंदर, अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त विरीगी आहेत; पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की, त्याच्याकडे संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल इत्यादी सर्व पूर्ण रुपामध्ये आहे. केवळ श्रीकृष्णच तसे ठामपणे सांगू शकतात कारण ते पुरूषोत्तम श्रीभगवान आहेत. ब्रह्मदेव, भगवान शिव, नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्णांइतके संपूर्ण ऐश्वर्य नाही. म्हणून स्वत: ब्रह्मदेवांनी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत. त्यांच्या बरोबरीचा किंव त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही. तेच आदिपुरूष किंवा भगवान आहेत व गोविंद या नावाने जाणले जातात आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत.
ईश्वर: परम: कृष्ण: सच्चिदानन्दविग्रह: अनादिरादिगोंविन्द: सर्वकारणकारणम् ।।
‘‘भगवंतांच्या गुणांनी संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत; परंतु श्रीकृष्ण हेच सर्वश्रेष्ठ आहेत कारण, कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. तेच परम पुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत, पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमयी आहे (सच्चिदानंद), तेच आदिपुरूष श्रीगोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण आहेत.’’ (ब्रह्मसंहिता ५.१)
श्रीमद्भागवतातसुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या अनेक अवतांराची यादी आहे. पण श्रीकृष्णांचे आदिपुरुष श्रीभगवान असेच वर्णन करण्यात आले आहे व त्यांच्यापासूनच अनेकानेक अवतारांचा विस्तार होतो.
एते चांशकला: पुस: कृष्णस्तु भगवान् स्वयम् । इन्द्रारिव्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे ।।
‘‘या ठिकाणी भगवंतांच्या ज्या अवतारांची यादी देण्यात आली आहे ती म्हणजे भगवंतांची विस्तारित रुपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंशरूपे आहेत, पण श्रीकृष्ण हे स्वत: पूर्ण पुरूषोत्तम भगवान आहेत.’’ (श्रीमद्भागवत १.३.२८)
म्हणून परामात्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण हेच पूर्णपुरुषोत्तम भगवान, परम सत्य आहेत.
पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलगांबद्दल शोक हा निश्चितच अशोभनीय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण कुत: म्हणजेच कोठून या शब्दांत आपले आश्चर्य व्यक्त करतात. आर्य म्हणून जाणल्या जाणार्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अपेक्षित नव्हते. आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवनमूल्यांवर आधारित असणार्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो. जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परम सत्य, श्रीविष्णू किंवा श्रीभगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते. ते भौतिक जगाच्या बाह्यात्कारी रूपाद्वारे आकर्षिले गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय, याचे ज्ञानच नसते. ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटले जाते. अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून तो च्युत होत होता. अशा प्रकारची भ्याडवृत्ती ही अनार्यांनाच शोभणारी होती. अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास साहाय्यक तर होतच नाही आणि या जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधीसुद्धा त्याला मिळत नाही. अर्जुनाची आपल्या नातलगांबद्दलची तथाकथित करूणा भगवान श्रीकृष्ण मान्य करीत नाहीत.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com