वेदाबेस​

श्लोक 2 . 17

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ १७ ॥

शब्दार्थ

अविनाशि-नाशरहित; तू-परंतु; तत् विद्धि- ते जाणून घे; येन-ज्याने; सर्वम् - संपूर्ण शरीर; इदम्-हे; ततम् - व्यापलेले आहे; विनाशम् -विनाश: अव्ययस्य-जे अविनाशी आहे त्याचे; अस्य-या; न कश्चित् - कोणालाही नाही; कर्तुम् - करणे; अर्हति-शक्य

भाषांतर

जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही.

तात्पर्य

या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरुपाचे विश्‍लेषण करून सांगण्यात आले आहे. संपर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्णरुपामध्ये होणाऱ्या सुखदु:खांची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वत:च्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदु:खाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवाचे परिमाण केसाच्या वरच्या अग्राच्या एक दशसहस्रांशाइतके आहे असे सांगण्यात येते; याची पुष्टी श्‍वेताश्वतरोपनिषदात (5.9) करण्यात आली आहे.

bālāgra-śata-bhāgasya
śatadhā kalpitasya ca
bhāgo jīvaḥ sa vijñeyaḥ
sa cānantyāya kalpate

‘‘केसाच्या वरच्या अग्राचे शंभर भागांमध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा शंभर भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल.’’ याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्‍लोकातही आढळते.

keśāgra-śata-bhāgasya
śatāṁśaḥ sādṛśātmakaḥ
jīvaḥ sūkṣma-svarūpo ’yaṁ
saṅkhyātīto hi cit-kaṇaḥ

‘‘आध्यात्मिक चित्कण संख्यातीत आहेत व त्यांचे परिमाण (आकार) हे केसाच्या अग्रभागाच्या एक दशसहस्त्रांशाइतके आहे.’’

म्हणून व्यक्तिगत आत्मारुपी चित्कण हा भौतिक अणूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कण आहेत. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुलिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्त्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो. त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुलिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतनारूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजेच जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरवठा आहे. चेतनाविरहित भौतिक शरीर म्हणजेच मृत शरीर हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मुण्डकोपनिषदामध्ये (3.1.9) आण्विक जीवात्म्याच्या परिमाणासंबंधी अधिक विश्‍लेषण करण्यात आले आहे.

eṣo ’ṇur ātmā cetasā veditavyo
yasmin prāṇaḥ pañcadhā saṁviveśa
prāṇaiś cittaṁ sarvam otaṁ prajānāṁ
yasmin viśuddhe vibhavaty eṣa ātmā

‘‘आत्म्याचा आकार परमाणुरुप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते. हा परमाणुरुप, पाच प्रकारच्या प्राणांत (प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान) तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा पाच प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दृग्गोच्चर होतो.’’

विविध आसनांद्वारे, पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या पाच प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरिता नसून, सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरिता आहे.

म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अणुरुप जीवात्म्याचे स्वरुप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कलशून्य व्यक्तीच हा परमाणुरुप जीवात्मा सर्वव्यापी विष्णुतत्व आहे असे म्हणू शकते.

परमाणुरुप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरु शकतो. मुण्डकोपनिषदाप्रमाणे हा अणुरुप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अणुरुप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की, आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अणुरुप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा याठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्व मान्य करते; पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाहीत. तरीसुद्धा वैद्यकशास्त्र मान्य करते की, हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे.

परमात्म्याच्या अशा अणुरुप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरुपे म्हणजे भगवंतांच्या किरणातील आण्विक स्फुलिंग आहेत. त्यांना ‘प्रभा’ किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्रीभगवंतांनी स्वत: भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com