श्लोक 2 . 12
न चैव नभविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥
शब्दार्थ
न-कधीच नाही; तु-परंतु; एव-निश्चितपणे; अहम्-मी; जातु-कोणताही काळ; न-नाही; आसम्- अस्तित्व; न-नाही; त्वम् -तू; न- नाही; इमे- हे सर्व; जन-अधिपा:-राजे; न-कधीच नाही; च-सुद्धा; एव-निश्चित; न-नाही; भविष्याम:- अस्तित्वात राहू; सर्वे वयम्-आपण सर्वजण; अत:परम्-यापुढे.
भाषांतर
ज्याकाळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही.
तात्पर्य
वैयक्तिक कर्मांनुसार आणि कर्मफलांनुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालनकर्ता पुरूषोत्तम श्रीभगवान आहेत असे काठोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषदांमध्ये सांगण्यात आले आहे. तेच पुरूषोत्तम श्रीभगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते. (कठोपनिषद् 2.2.13)
नित्यो नित्यांना चेतनश्वेतनानाम् एको बहूनां यो विदधाति कामान्। ततात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरास्तेषां शान्ति: शाश्वती नेतरेषाम् ॥
(कठोपनिषद् 2.2.13)
अर्जुनाला जे वैदिक सत्य सांगण्यात आले ते जगातील सर्व व्यक्तींनाही,विशेष करून ज्यांच्याकडे वास्तविकपणे अतिशय तोकडे ज्ञान आहे, पण स्वत: विद्वान असल्याचा देखावा करतात, त्यांना सांगण्यात आले आहे. भगवान स्पष्टपणे सांगतात की, ते स्वत:, अर्जुन आणि युद्धभूमीवर जमलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते आणि बद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच नित्य पालनकर्ता आहेत. पुरुषोत्तम श्रीभगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंतांचा नित्य सहचर अर्जुन व उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मा आहेत. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असेही नाही. त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्यकाळातही अखंडपणे चालू राहीलच म्हणून कोणाबद्दलही शोक करण्याचे कारण नाही.
मायावादी तत्वज्ञान सांगते की, मोक्षानंतर जीवात्मा हा मायेच्या आवरणापासून अलग होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो; पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी पुष्टी दिली नाही. तसेच फक्त बद्धावस्थेतच आपण वैयक्तिक अस्तित्वात विचार करतो या सिद्धांतालाही या ठिकाणी पुष्टी मिळत नाही. उपनिषदांत सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी श्रीकृष्णसुद्धा सांगतात की, भविष्यकाळातही भगवंत आणि इतरांचे स्वतंत्र अस्तितव निरंतर चालूच राहील. श्रीकृष्णांचे हे विधान अधिकृत आहे, कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर जीवाचे स्वतंत्र अस्तित्व ही वास्तविकता नसती तर भविष्यकाळातील जीवाच्या स्वतंत्र व्यक्तित्वावर श्रीकृष्णांनी इतका जोर दिलाच नसता. यावर प्रतिवाद करण्यासाठी मायावादी म्हणू शकतील की, श्रीकृष्णांनी स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून भौतिक आहे. जरी हा युक्तिवाद मान्य केला, की व्यक्तित्व हे भौतिक आहे, तरी श्रीकृष्णांच्या स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल काय? श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्त्विाबद्दल खात्रीपूर्वक सांगतात आणि भविष्यकाळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दलही निश्चिती देतात. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व अनेकविध रीतींनी निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्याहून गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व सर्वत्र कायम ठेवले आहे. जर त्यांचा अहंकारी सामान्य बद्ध जीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेला प्रमाणित शास्त्र म्हणून काहीच किंमत राहात नाही. मानवी दुर्बलतेच्या चार दोषांनी युक्त सामान्य मनुष्य श्रवणयोग्य ज्ञानाबद्दल शिक्षण देण्यास असमर्थ आहे. भगवद्गीता ही सामान्य अशा साहित्याहून श्रेष्ठ आहे. कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकाची भगवद्गीतेशी तुलना होऊच शकत नाही. जेव्हा एखादा श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्व नाहीसे होते. मायावादी असा युक्तिवाद करतात की, या श्लोकात जे अनेकत्व सांगितले आहे ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आले आहे; परंतु यापूर्वीच्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करण्यात आले आहे. जीवांच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच निंदा केल्यावर पुन्हा शरीरविषयक रूढीला चिकटून असणारे विधान श्रीकृष्णांद्वारे केले जाणे कसे शक्य आहे? म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे आणि याची पुष्टी श्रीरामानुजाचार्यांसारख्या इतर आचार्यांनीही केली आहे. गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जे भगवंतांचे भक्त आहेत तेच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाबद्दल जाणू शकतात. पुरूषोत्तम श्रीभगवान म्हणून श्रीकृष्णांचा जे द्वेष करतात ते या महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करूच शकत नाहीत. अभक्ताद्वारे भगवद्गीतेतील शिकवणूक जाणण्याचा प्रयत्न म्हणजे मधमाशीने मधाची बाटली बाहेरून चाटल्याप्रमाणेच आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची बाटली उघडल्यावाचून त्यातील मधाची चव घेता येत नाही. त्याचप्रमाणे या ग्रंथातील चौथ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवद्भक्ताशिवाय इतर कोणीही भगवद्गीता जाणूच शकत नाही. तसेच ज्या व्यक्ती भगवंतांच्या अस्तित्वाबद्दल द्वेष करतात त्यांनाही गीतेमधील रहस्याला स्पर्शही करणे शक्य नाही, म्हणून गीतेवरील मायावादी टीका ही परम सत्याबद्दल अत्यंत दिशाभूल करणारी आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे आणि असेही सूचित आहे की, जो अशा मायावादी तत्वज्ञानाचा स्वीकार करतो तो गीतेतील वास्तविक रहस्य जाणण्यास असमर्थ ठरतो. जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टीशी संबंधित असते तर भगवंतांनी गीतोपदेश करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. स्वतंत्र जीव आणि भगवंत यांचे अनेकत्व ही वास्तविकता आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com