वेदाबेस​

श्लोक 12.6 - 7

ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा: ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७ ॥
ye tu sarvāṇi karmāṇi
mayi sannyasya mat-parāḥ
ananyenaiva yogena
māṁ dhyāyanta upāsate
 
teṣām ahaṁ samuddhartā
mṛtyu-saṁsāra-sāgarāt
bhavāmi na cirāt pārtha
mayy āveśita-cetasām

शब्दार्थ

ये-जे; तु-परंतु; सर्वाणि-सर्व, कर्माणि-कर्मे, मयि-मला, सन्यस्य-त्याग करून, मत्परा:-माझ्यावर आसक्त होऊन; अनन्येन-अनन्य; एव-निश्चितच; योगेन-भक्तियोगाच्या आचरणाने; माम्-माझे; ध्यायन्तः-ध्यान करीत; उपासते-उपासना करतात; तेषाम्-त्यांचा; अहम्-मी; समुद्धत-उद्धारक; मृत्यु-मृत्यूच्या; संसार-संसार; सागरात्-सागरापासून; भवामि-मी होतो; न-नाही; चिरात्—दीर्घकालाने; पार्थ-हे पार्थ; मयि-माझ्या ठायी; आवेशित-स्थिर; चेतसाम्-ज्यांचे मन.

भाषांतर

परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्यभावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा, हे पार्था, मी जन्ममृत्यूरूपी संसारसागरातून त्वरित उद्धार करतो.

तात्पर्य

या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की, भक्त हे फार भाग्यवान आहेत, कारण भगवंत त्यांचा संसारसागरातून त्वरित उद्धार करतात. शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो की, भगवंत हे महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहे. भगवंतांची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि जर त्याने हे कर्तव्य निभावले नाही तर त्याला मायेची सेवा करावी लागते.

पूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तिद्वारेच भगवंतांना जाणणे शक्य आहे. म्हणून मनुष्याने अनन्य भक्ती केली पाहिजे. श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता त्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांच्या ठायी स्थित केले पाहिजे. मनुष्याने केवळ श्रीकृष्णांप्रीत्यर्थच कर्म केले पाहिजे. तो कोणत्या प्रकारचे कर्म करीत आहे हे महत्वपूर्ण नाही तर ते कर्म केवळ श्रीकृष्णांप्रीत्यर्थ असते आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व काही त्याग केले त्याप्रमाणे मनुष्य आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आणि त्याच वेळी हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम राम राम हरे हरे || या महामंत्राचा जपही करू शकतो. अशा दिव्य कीर्तनाने भक्त, भगवंतांकडे आकृष्ट होतो.

भगवंत या ठिकाणी वचन देतात की, याप्रमाणे भक्तीमध्ये संलग्न झालेल्या शुद्ध भक्ताचा भगवंत विनाविलंब संसारसागरातून उद्धार करतात. ज्यांनी योगाभ्यासात उन्नती केली आहे ते योगसामथ्र्याद्वारे आपल्या स्वेच्छेनुसार हव्या त्या ग्रहलोकामध्ये आत्म्याला नेऊ शकतात आणि इतर योगिजन अशा संधीचा विविध प्रकारे लाभ घेतात; परंतु भक्ताबद्दल सांगावयाचे तर, या शलोकामध्ये स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे भगवंत स्वत: भक्ताचा उद्धार करतात आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यासाठी उन्नत होण्याची भक्ताला प्रतीक्षा करावी लागत नाही.

वराहपुराणात पुढील श्लोक आढळतो,

nayāmi paramaṁ sthānam
arcir-ādi-gatiṁ vinā
garuḍa-skandham āropya
yatheccham anivāritaḥ

या श्लोकाचे तात्पर्य हेच आहे की, भक्ताने स्वतःला वैकुंठलोकात नेण्यासाठी अष्टांगयोगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. याची जबाबदारी स्वत: भगवंतांनी घेतली आहे. या शलोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की, मी स्वत: भक्ताचा उद्धारक होतो. एखाद्या बालकाची मातापिता पूर्ण काळजी घेतात आणि म्हणून बालक सुरक्षित असते, त्याचप्रमाणे भक्ताने स्वत:हून योगाभ्यासाद्वारे इतर ग्रहलोकांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही. उलट भगवंत, भक्तावर कृपा करण्यासाठी आपल्या गरुड वाहनावर आरूढ होऊन तात्काळ येतात आणि संसारसागरातून त्याची त्वरित मुक्तता करतात. समुद्रात पडलेल्या मनुष्याने जरी अतिशय धडपड केली आणि पोहण्यात तो जरी अतिशय निष्णात असला तरी तो स्वतःला वाचवू शकत नाही. परंतु इतर कोणी मनुष्याने त्याला पाण्यातून बाहेर काढले तर सहजपणे त्याची सुटका होऊ शकते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भक्ताला संसारसागरातून बाहेर काढतात. मनुष्याने केवळ सुगम कृष्णभावनेचे आचरण केले पाहिजे आणि पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. बुद्धिमान मनुष्याने इतर कोणत्याही मार्गाच्या तुलनेत भक्तिमार्गाला नेहमी प्राधान्य द्यावे. नारायणीय यामध्ये याला पुढीलप्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे,

yā vai sādhana-sampattiḥ
puruṣārtha-catuṣṭaye
tayā vinā tad āpnoti
naro nārāyaṇāśrayaḥ

या श्लोकाचे तात्पर्य आहे की, मनुष्याने सकाम कर्माच्या विविध मार्गी किंवा तार्किक ज्ञानप्राप्तीच्या मागे लागू नये. भगवद्भक्तीमध्ये निमग्न असणा-या भक्ताला इतर योगमार्गापासून तर्कवाद, कर्मकांड, दान, यज्ञ इत्यादींपासून प्राप्त होणारे लाभ, आपोआपच प्राप्त होतात. भक्तियोगाचा हा विशेष अनुग्रह आहे.

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे / या पवित्र हरिनामाचा केवळ जप केल्याने भगवद्भक्ताला परमलक्ष्याची प्राप्ती सुखाने आणि सहजपणे होते, परंतु याच परमलक्ष्याची प्राप्ती इतर कोणत्याही धार्मिक विधीने होऊ शकत नाही.

भगवद्गीतेचा निष्कर्ष अठराव्या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे.

sarva-dharmān parityajya
mām ekaṁ śaraṇaṁ vraja
ahaṁ tvāṁ sarva-pāpebhyo
mokṣayiṣyāmi mā śucaḥ

आत्मसाक्षात्काराच्या इतर सर्व मार्गाचा मनुष्याने त्याग केला पहिजे आणि केवळ कृष्णभावनाभावित भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे. यामुळे त्याला जीवनाच्या परमोच्च संसिद्धीची प्राप्ती होईल. त्याने गतजीवनातील पापकर्मांचा विचार करण्याचीही आवश्यकता नाही, कारण भगवंत स्वत: त्याची पूर्ण जबाबदारी घेतात. म्हणून स्वत:हून आध्यात्मिक साक्षात्काराद्वारे स्वत:चा उद्धार करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये. प्रत्येकाने सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. यामध्येच जीवनाची परमसिद्धी आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com