वेदाबेस​

श्लोक 11.54

भक्त्य‍ा त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ५४ ॥
-

शब्दार्थ

भक्त्या- भक्तीने; तु-परंतु अनन्यया-अनन्य किंवा सकाम कर्म आणि तार्किकज्ञानाने रहित, शक्यः-शक्य; अहम्-मी; एवम्-विधः--याप्रमाणे; अर्जुन-हे अर्जुन: ज्ञातुम्-जाणणे; द्रष्टम- पाहणे; च-आणि; तत्त्वेन-तत्वत:; प्रवेष्टुम्‌-प्रवेश करणे; च-सुद्धा; परन्तप-हे परतप.

भाषांतर

हे अर्जना! मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्त्वात प्रवेश करू शकतोस.

तात्पर्य

अनन्य भक्तियोगानेच श्रीकृष्णांना जाणणे शक्य आहे ही गोष्ट श्रीकृष्ण या श्लोकामध्ये विस्तृतपणे वर्णन करून सांगतात, कारण यामुळे तर्काने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करणारे अनधिकृत भाष्यकार जाणू शकतील की, ते केवळ कालापव्यय करीत आहेत. आपल्या मातापित्यांसमोर श्रीकृष्ण कसे चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले आणि नंतर स्वत:चे द्विभुज रूपामध्ये त्यांनी कसे रूपांतर केले हे कोणीही जाणू शकत नाही. वेदाध्ययनाने किंवा ज्ञानमार्गाने या गोष्टी जाणणे अतिशय कठीण आहे. म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, कोणीही त्यांना पाहू शकत नाही किंवा या गोष्टींच्या रहस्यात प्रवेश करू शकत नाही. तथापि, जे वेदपारंगत आहेत ते वेदांमधून त्यांना अनेक प्रकारे जाणू शकतात. वैदिक विधिविधाने अनेक आहेत आणि जो खरोखरच श्रीकृष्णांना जाणू इच्छितो त्याने प्रमाणित शास्त्रांमध्ये निर्देशित केलेल्या वैदिक विधिविधानांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्या तत्त्वानुसार मनुष्य तपस्या करू शकतो. उदाहरणार्थ, ज्याला कठोर तपस्या करावयाची आहे तो जन्माष्टमी, दर मासातील दोन एकादशी इत्यादी दिवशी उपवासाचे व्रत राखू शकतो. दानाबद्दल सांगावयाचे तर, हे स्पष्टच आहे की, कृष्णतत्त्वाचा किंवा कृष्णभावनेचा संपूर्ण विश्वभर प्रसार करण्यासाठी कृष्णभक्तीमध्ये जे संलग्न झाले आहेत त्यांना दान देण्यात यावे. कृष्णभावनामृत हे मानवतेला लाभलेले मोठे वरदान आहे. रूप गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूची, अत्यंत उदार पुरुष म्हणून स्तुती केली आहे. कारण अतिशय दुर्लभ असे कृष्णप्रेम त्यांनी मुक्त हस्ते वितरित केले. म्हणून कृष्णभावनेचा प्रचार करण्यात संलग्न असणा-या व्यक्तींना जर मनुष्याने काहीही दान दिले तर कृष्णभावनामृताच्या प्रसारासाठी देण्यात आलेले ते दान म्हणजे जगामधील सर्वश्रेष्ठ दान होय. मनुष्याने मंदिरामध्ये ठरावीक पद्धतीने पूजन करणे (भारतातील मंदिरांमध्ये सामान्यतः श्रीविष्णू किंवा श्रीकृष्णांचा विग्रह असतो) म्हणजे प्रगती करण्याची एक संधीच आहे. भगवद्भक्तीमधील नवसाधकांसाठी विग्रह-सेवा आवश्यक आहे आणि वेदांमध्ये (श्वेताश्वतरोपनिषद् ६.२३) या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे.

यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ। तस्यैते कथिता ह्यर्था: प्रकाशन्ते महात्मन:।।

ज्या मनुष्याकडे अनन्य भगवद्भक्ती आहे आणि त्याचा अढळ दृढ विश्वास असणा-या आध्यात्मिक गुरूद्वारे ज्याला मार्गदर्शन प्राप्त झाले आहे त्याला साक्षात्काराद्वारे भगवद्दर्शन होऊ शकते. तर्काने मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. ज्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक प्रशिक्षण घेतले नाही त्याला कृष्णतत्त्वाचे प्रारंभिक ज्ञान देखील होणे अशक्य आहे. या श्लोकामध्ये तु हा शब्द विशेषरूपाने योजिलेला आहे आणि या शब्दावरून दर्शविले आहे की, श्रीकृष्णांना जाणण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब किंवा विधान करता येत नाही किंवा इतर कोणता मार्ग सफलही होऊ शकत नाही.

श्रीकृष्णांची द्विभुज आणि चतुर्भुज रूपे ही अर्जुनाला दाखविण्यात आलेल्या विश्वरूपाहून पूर्णतया भिन्न आहेत. चतुर्भुज नारायण रूप आणि द्विभुज कृष्णरूप हे शाश्वत आणि दिव्य आहे तर अर्जुनाला प्रकट करण्यात आलेले विश्वरूप हे अस्थायी आहे. सुदुर्दर्शम् अर्थात, पाहण्यास कठीण हा शब्दच सुचवितो की, यापूर्वी कोणीच ते विश्वरूप पाहिले नव्हते. तो असेही सुचवितो की, भक्तांसाठी विश्वरूप दाखविणे आवश्यक नव्हते. अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप प्रकट केले होते, जेणेकरून भविष्यकाळात जर एखाद्याने स्वत:ला परमेश्वराचा अवतार म्हणून प्रस्तुत केले तर लोक त्याला आपले विश्वरूप दाखविण्यास सांगू शकतील.

पूर्वीच्या श्लोकामध्ये वारंवार योजिलेला 'न'हा शब्द दर्शवितो की, वेदपारंगत, विद्वान आदी उपाधींमुळे मनुष्याने अहंभाव ठेवू नये. त्याने कृष्णभक्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्यानंतरच केवळ तो भगवद्गीतेवर टीका करू शकतो.

श्रीकृष्ण, विश्वरूपातून चतुर्भुज नारायण रूपामध्ये व नंतर स्वतःच्या स्वाभाविक द्विभुज रूपामध्ये स्वतःचे रूपांतर करतात, यावरून दर्शविले जाते की, चतुर्भुज रूपे आणि वेदांमध्ये वर्णिलेली इतर सर्व रूपे ही श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपामधून प्रकट झाली आहेत. श्रीकृष्ण हेच सर्व प्रकट रूपांचे उद्गम आहेत. या रूपांपासूनही श्रीकृष्ण भिन्न आहेत, तेव्हा निर्विशेष (हे रूप महाविष्णू म्हणून जाणले जाते आणि हे महाविष्णू कारणोदकशायी सागरामध्ये पहुडलेले आहेत व त्यांच्या श्वासोच्छवासाबरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात) भगवंतांचे विस्तारित रूप आहे. ब्रह्मसंहितेत (५.४८) सांगितल्याप्रमाणे,

यस्यैकनिश्र्वसितकालमथावलम्ब्य । जीवन्ति लोमविलजा जगदण्डनाथा:। विष्णुर्महान्‌ स इह यस्य कलाविशेषो गोविन्दमादि पुरुषं तमहं भजामि ।।

‘‘ज्या महाविष्णूंच्या केवळ श्वासोच्छ्वासाबरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात ते महाविष्णूसुद्धा श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहेत. म्हणून मी सर्व कारणांने कारण श्रीकृष्ण, गोविंद यांना सादर वंदन,’’ म्हणून मनुष्याने निश्चितपणे श्रीकृष्णांच्या मूळ रूपाला सच्चिदानंद पुरुषोत्तम भगवंत म्हणून भजावे. श्रीकृष्ण हे सर्व विष्णुरूपांचे आणि सर्व अवतारांच्या रूपांचेही उगमस्थान आहेत आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तेच मूळ आदिपुरुष भगवान आहेत.

वेदांमध्ये (गोपाल तापनी उपनिषद् १.१) आपल्याला पुढील वर्णन आढळते.

सच्चिदानन्द रूपाय कृष्णायक्लिष्टकारिणे। नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे ।।

‘मी मन्चिदानंदरूप श्रीकृष्णांना सादर वंदन करतो. मी त्यांना वंदन करतो, कारण त्यांना जाणणे म्हणजेच वेद जाणणे होय आणि म्हणून ते आद्यगुरू आहेत.’’ नंतर म्हटले आहे की, कृष्णौ वै परमं दैवतम्‌ - 'श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत' (गोपाल तापनी १.३) एको वशी सर्वग: कृष्ण ईंड्य:-श्रीकृष्ण हेच एकमेव भगवान आहेत आणि ते पूजनीय आहेत.' एकोऽपि सन्बहुधा योऽवभाति-श्रीकृष्ण हे एकमेवाद्वितीय आहेत; परंतु तेच अनंत रूपांमध्ये आणि अवतारांमध्ये प्रकट होतात. (गोपाल तापनी उपनिषद् १.२१)

(ब्रह्मसंहितेत५.१) म्हटले आहे की,

ईश्वर: परम: कृष्ण: सच्चिदानन्दविग्रह: अनादिरादिगोंविन्द: सर्वकारणकारणम्‌ ।।

'श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि त्यांचा विग्रह सच्चिदानंद आहे. त्यांना आदी नाही कारण तेच सर्वांचे आदी आहेत. तेच सर्व कारणांचे कारण आहेत.''

'इतरत्र म्हटले आहे की, यत्रावतीर्ण कृष्णाख्यं परं ब्रह्म नराकृति-'परब्रह्म एक व्यक्ती आहे. त्यांचे नाव कृष्ण आहे आणि ते कधी कधी या भूतलावर अवतीर्ण होतात.'त्याचप्रमाणे श्रीमद्भागवतात आपल्याला भगवंतांच्या सर्व अवतारांचे वर्णन आढळते आणि यामध्ये श्रीकृष्णांचेही नाव आहे. परंतु नंतर म्हटले आहे की, श्रीकृष्ण हे एक अवतार नसून ते स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत। (एते चांशकला: पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयम्)

त्याचप्रमाणे भगवद्गीतेतही भगवंत सांगतात की, मत्त्: परतरं नान्यत्‌ 'माझ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान या रूपापेक्षा इतर काहीही श्रेष्ठ नाही. 'भगवद्गीतेत इतरत्र ते असेही सांगतात की, अहं' आदिहि देवनामू- 'मीच सर्व देवतांचे उगमस्थान आहे.' आणि श्रीकृष्णांकडून भगवद्गीता जाणून घेतल्यावर अर्जुनही म्हणतो की, परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्‌— 'मी आता पूर्णपणे जाणतो की, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परब्रह्म आहात आणि तुम्ही सर्वांचे परम आश्रय आहात.' म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला जे विश्वरूप दाखवितात ते भगवंतांचे मूळ स्वरूप नव्हे. कृष्णरूप हेच मूळ स्वरूप आहे. ज्यांना भगवंतांविषयी प्रेम नाही त्यांचे लक्ष वेधून घेण्याकरिताच सहस्रावधी शिर आणि हात असलेले विश्वरूप प्रकट करण्यात आले. हे परमेश्वराचे मूळ रूप नाही.

भगवंतांशी निरनिराळ्या दिव्य रसांद्वारे संबंधित असणार्या शुद्ध भक्तांना विश्वरुपाचे विशेष आकर्षण नसते. भगवंत आपल्या मूळ कृष्णरूपामध्ये दिव्य प्रेमाचे आदानप्रदान करतात. म्हणून श्रीकृष्णांशी सख्यभाव असणा-या अर्जुनाला हे विश्वरूप आहाददायक वाटत नव्हते, उलट ते रूप पाहून तो भयभीत झाला होता. श्रीकृष्णांचा नित्य पार्षद असणा-या अर्जुनाला दिव्य दृष्टी असली पाहिजे, कारण तो काही साधारण मनुष्य नव्हता. म्हणून तो विश्वरूपाने मोहित झाला नाही. सकाम कर्माद्वारे जे उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी विश्वरूप हे अद्भुत असू शकेल, परंतु जे भक्तीमध्ये संलग्न झाले आहेत त्यांना द्विभुजधारी कृष्णरूपच अत्यंत प्रिय आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com