वेदाबेस​

अध्याय पहिला

अर्जुनविषादयोग (कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण)

श्लोक 1: धृतराष्ट्र म्हणाला: हे संजया! कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या, युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले?

श्लोक 2: संजय म्हणाला : हे राजन्! पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढीलप्रमाणे बोलण्यास आरंभ केला.

श्लोक 3: हे आचार्य ! तुमचा बुद्धिमान शिष्य, द्रुपदपुत्र, याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडवसेना पहा.

श्लोक 4: येथे (या सैन्यामध्ये) भीम आणि अर्जुन यांच्याबरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत.

श्लोक 5: तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशिराज, पुरुजित, कुंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत.

श्लोक 6: तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत.

श्लोक 7: हे ब्राह्मणश्रेष्ठ! तुमच्या माहितीकरिता, माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो.

श्लोक 8: येथे आपण स्वत:, भीष्म, कर्ण, कृप, अश्व त्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्तपुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत.

श्लोक 9: माझ्यासाठी स्वत:च्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत.

श्लोक 10: आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत; परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे.

श्लोक 11: आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण साह्य केले पाहिजे.

श्लोक 12: नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने, सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला.

श्लोक 13: त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता.

श्लोक 14: दुसऱ्या बाजूला, शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले.

श्लोक 15: भगवान श्रीकृष्णांनी आपला पाञ्चजन्य नावाचा शंख वाजविला; अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौण्ड्र नामक शंख वाजविला.

श्लोक 16 - 18:कुंतीपूत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंतविजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन्! महाधनुर्धर काशीनरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले.

श्लोक 19: हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली.

श्लोक 20: हनुमानाचे चिह्न असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्या वेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन्! व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढीलप्रमाणे म्हणाला.

श्लोक 21 - 22: अर्जुन म्हणाला: हे अच्युत! कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्रस्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन.

श्लोक 23: धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खूष करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे.

श्लोक 24: संजय म्हणाला: हे भरतवंशजा! या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला.

श्लोक 25: भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ! येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा.

श्लोक 26: त्याठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये, आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले.

श्लोक 27: जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकूळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला.

श्लोक 28: अर्जुन म्हणाला: हे कृष्ण! या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे.

श्लोक 29: माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे.

श्लोक 30: मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वत:चाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा! मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत.

श्लोक 31: या युद्धामध्ये माझ्या स्वत:च्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे, कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही, आणि हे कृष्ण! त्यापासून प्राप्त होणारे विजयसुख आणि राज्य याची इच्छादेखील मी करू शकत नाही.

श्लोक 32 - 35: हे गोविंद! ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वाचा काय लाभ आहे? हे मधुसूदन! जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी? हे जनार्दन! पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार?

श्लोक 36: या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव! आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ?

श्लोक 37 - 38: हे जनार्दन! जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याला मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे?

श्लोक 39: कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंशपरंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते.

श्लोक 40: हे कृष्ण! कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे, हे वृष्णीवंशजा! अवांछित संतती उत्पन्न होते.

श्लोक 41: अनावश्यक संततीच्या वाढीमुळे, कूळ तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जलअर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते.

श्लोक 42: वंशपरंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंबकल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात.

श्लोक 43: हे प्रजापालक! हे कृष्णा! गुरुशिष्यपरंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की, कुलपरंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात.

श्लोक 44: अरेरे! आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे! राज्यसुख भेागण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत.

श्लोक 45: शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या नि:शस्त्र आणि प्रतिकार न करणार्‍यांची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल.

श्लोक 46: संजय म्हणाला: रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com