वेदाबेस​

श्लोक 11.55

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भ‍क्त: सङ्गवर्जित: ।
निर्वैर: सर्वभूतेषु य: स मामेति पाण्डव ॥ ५५ ॥
-

शब्दार्थ

मत्-कर्म-कृत्—माझे कर्म करण्यामध्ये संलग्न झालेला; मत्-परमः—मला परमश्रेष्ठ मानून, मत्भक्तः-माझ्या भक्तीमध्ये संलग्न झालेला; सङ्ग-वर्जितः-सकाम कर्म आणि तर्कवाद यांच्या संगातून मुक्त; निर्वैरः-शत्रूरहित; सर्व-भूतेषु-सर्व जीवांमध्ये; यः-जो; सः—तो; माम्-मला; एति-येतो, प्राप्त होतो; पाण्डव-हे पांडव.

भाषांतर

हे अर्जुना! जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संगातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्याप्रीत्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणिमात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो.

तात्पर्य

ज्याला आध्यात्मिक विश्वातील कृष्णलोकामधील परमपुरुष श्रीकृष्णांची प्राप्ती करून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करावयाची इच्छा आहे, त्याने परमपुरुषाने स्वतः सांगितलेल्या आदेशांचे पालन केले पाहिजे. म्हणून या श्लोकाला भगवद्गीतेचे सार म्हटले जाते. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या हेतूने जे भौतिक जगतामध्ये रत झाले आहेत आणि ज्यांना वास्तविक आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान नाही त्या बद्ध जीवांना मार्गदर्शन करण्याकरिता भगवद्गीता हा ग्रंथ आहे. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे आणि परमपुरुषाशी असणा-या आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान आपल्याला कसे होऊ शकेल हे सांगणे आणि आपण स्वगृही भगवद्धामात परत कसे जाऊ शकतो हे शिकविणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. आता या श्लोकामध्ये अशा पद्धतीचे विश्लेषण करण्यात आले आहे की, ज्यायोगे मनुष्य भक्तीमध्ये सफल होऊ शकतो.

कर्माविषयी सांगावयाचे तर मनुष्याने पूर्ण शक्तीनिशी कृष्णभावनाभावित कर्म केले पाहिजे. भक्तिरसामृतसिंधूमध्ये (२.२५५) सांगितल्याप्रमाणे,

अनासक्तस्य विषयान्‌ यथार्हमुपयुञ्जत:। निर्बन्ध: कृष्णसम्बन्धे युक्तं वैराग्यमुच्यते ।।

श्रीकृष्णांशी संबंधित असलेल्या कर्माखेरीज इतर कोणतेही कर्म करू नये. यालाच कृष्णकर्म असे म्हणतात. मनुष्य विविध प्रकारचे कार्य करीत असेल; परंतु त्याने आपल्या कर्मफलांवर आसक्त असू नये तर ते कर्मफल केवळ श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे. उदाहरणार्थ, मनुष्य उद्योगधंदा करीत असेल, परंतु त्या उद्योगधंद्याचे कृष्णभावनाभावित कर्मामध्ये रूपांतर करण्याकरिता त्याने श्रीकृष्णांप्रीत्यर्थ उद्योगधंदा केला पाहिजे. जर श्रीकृष्ण हे उद्योगधंद्याचे मालक असतील तर श्रीकृष्णांनी उद्योगाद्वारे प्राप्त होणा-या नफ्याचा भोग घेतला पाहिजे. जर एखादा व्यापारी लाखोपती आहे आणि जर त्याला हे सर्व धन श्रीकृष्णांना अर्पण करावयाचे असेल तर तो अर्पण करू शकतो. हे कर्म श्रीकृष्णांप्रीत्यर्थ कर्म होते. स्वतःच्या इंद्रियतृप्तीकरिता गगनचुंबी इमारत बांधण्याऐवजी तो श्रीकृष्णांसाठी एखादे सुंदर मंदिर बांधू शकतो आणि अधिकृत भक्तिशास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना करून विग्रहसेवेची व्यवस्था करू शकतो. हे सर्व कृष्ण-कर्म होय. मनुष्याने कर्मफलावर आसक्त असू नये तर कर्मफल हे श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे आणि श्रीकृष्णांना अर्पिलेल्या नैवेद्याचे अवशेष त्याने प्रसादरूपाने ग्रहण करावे. जर एखाद्याने श्रीकृष्णांकरिता विशाल मंदिर बांधले आणि श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना केली तर तो मनुष्य त्या ठिकाणी राहू शकतो, परंतु त्याने जाणले पाहिजे की, मंदिराचे स्वामी श्रीकृष्ण आहेत. यालाच कृष्णभावना असे म्हणतात. तथापि, जर मनुष्याला श्रीकृष्णांकरिता मंदिर बांधता आले नाही तर तो कृष्णमंदिर स्वच्छ करू शकतो. हे सुद्धा कृष्ण कर्मच आहे. मनुष्य एखादा बगीचा बनवू शकतो. ज्याच्याजवळ जमीन आहे, निदान भारतामध्ये गरीब मनुष्याकडेही थोडीफार जमीन असते; तो जागेमध्ये श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी फुलबाग निर्माण करू शकतो व अशा रीतीने त्या जमिनीचा उपयोग श्रीकृष्णांप्रीत्यर्थ करू शकतो. तो तुळशीची रोपे वाढवू शकतो, कारण तुलसीपत्र अत्यंत महत्वपूर्ण असते आणि श्रीकृष्णांनी यासंबंधी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की, पत्र पुष्पं फलं तोयम्- मनुष्याने श्रीकृष्णांना एखादे पत्र, फळ, फूल किंवा थोडेसे पाणी अर्पण करावे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे ते प्रसन्नसुद्धा होतात. हा पत्रमशब्द विशेषकरून तुलसीपत्राचा निर्देश करतो. म्हणून तुळशीची रोपे लावावी आणि प्रतिदिनी त्या रोपट्यांना पाणी घालावे. अशा प्रकारे अत्यंत गरीब मनुष्यही श्रीकृष्णांची सेवा करू शकतो. मनुष्य कशा प्रकारे कृष्णकर्म करू शकतो हे दाखविण्यासाठी उपर्युक्त काही उदाहरणे देण्यात आली आहेत.

मत्परमः शब्दावरून, जो मनुष्य श्रीकृष्णांच्या परमधामामध्ये त्यांचे सानिध्य प्राप्त करणे म्हणजे जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे असे मानतो, त्या मनुष्याचा निर्देश करतात. अशा मनुष्याला चंद्र, सूर्य किंवा स्वर्गलोकाप्रत किंवा ब्रह्मांडातील अत्युच्च लोक, ब्रह्मलोकाप्रतही उन्नत होण्याची इच्छा नसते. त्याला अशा गोष्टींचे मुळीच आकर्षण नसते. आध्यात्मिक विश्वाप्रत उन्नत होण्याचे त्याला आकर्षण असते आणि आध्यात्मिक जगतातही ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यात तो समाधान मानीत नाही, कारण त्याला अत्युच्य आध्यात्मिक लोकामध्ये, कृष्णलोक, गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असते. कृष्णलोकाचे त्याला पूर्ण ज्ञान असते म्हणून त्याला इतर कोणत्याही लोकाचे आकर्षण नसते. मद्‌भक्त या शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे तो पूर्णपणे भक्तीमध्ये, विशेषकरून श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तिसेवेमध्ये संलग्न होतो. सर्व नऊ, आठ किंवा सात किंवा निदान एका भक्तिसेवेमध्ये संलग्न होता येते. त्यायोगे निश्चितच मनुष्याचे जीवन परिपूर्ण होते.

संग वर्जितः हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जे लोक श्रीकृष्णांचे विरोधक आहेत त्यांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. केवळ नास्तिकच श्रीकृष्णांचे विरोधक आहेत असे नव्हे तर जे सकाम कर्मात आसक्त आहेत आणि जे तर्कवादी आहेत ते सुद्धा श्रीकृष्णांचे विरोधकच आहेत. म्हणून शुद्ध भक्तीने विश्लेषण भक्तिसामृतसिंधूमध्ये (१.१.११) पुढीलप्रमाणे कारण्यात आले

अन्याभिलाषिताशून्यं ज्ञानकर्माद्यनावृतम्‌ । आनुकूल्येन कृष्णानुशीलनं भक्तिरूत्तमा ।।

या श्लोकामध्ये श्रील रूप गोस्वामी स्पष्टपणे सांगतात की, जर कोणाला अनन्य भक्ती करावयाची असेल तर त्याने सर्व भौतिक विकारांतून मुक्त होणे आवश्यक आहे. जे तर्कवादी आहेत आणि जे सकाम कर्म करण्याच्या अधीन झालेले आहेत त्यांच्या संगतीतून मनुष्याने पूर्णपणे मुक्त झालेच पाहिजे. जेव्हा अशा कु-संगतीतून आणि भौतिक इच्छांच्या विकारांतून मुक्त झाल्यावर तो अनुकूलतेने कृष्णज्ञानाचे अनुशीलन करतो आणि यालाच शुद्ध भक्ती म्हटले जाते. आनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूल्यस्य वजनम्-(हरिभक्तिविलास ११.६७६) मनुष्याने कृष्णचिंतन केले पाहिजे आणि श्रीकृष्णांकरिता, प्रतिकूल रुपाने नव्हे तर अनुकूल रूपाने कार्य केले पाहिजे. कंस हा श्रीकृष्णांचा शत्रू होता. श्रीकृष्णांच्या जन्मापासूनच कंसाने त्यांना मारण्यासाठी अनेक योजना आखल्या; परंतु सदैव अयशस्वी ठरत असल्याने तो सुद्धा सदैव कृष्णचिंतनच करीत असे. याप्रमाणे कार्य करताना, भोजन करताना सर्व बाबतीत तो सदासर्वदा कृष्णभावनाभावितच असे; परंतु या प्रकारची कृष्णभावना ही अनुकूल नव्हे, कारण दिवसातील चोवीस तास, सदैव जरी तो कृष्णचिंतन करीत होता तरी त्याला राक्षस समजण्यात येते आणि शेवटी श्रीकृष्णांनी त्याचा वध केला. अर्थात, श्रीकृष्णांकडून ज्याचा वध होतो त्याला मोक्षप्राप्ती होते; परंतु मोक्षप्राप्ती करणे हे शुद्ध भक्ताचे ध्येय नसते. शुद्ध भक्ताला मुक्तीचीही अभिलाषा नसते. सर्वोच्च लोकात, गोलोक वृंदावनातही जाण्याची त्याला इच्छा नसते. तो कुठेही असला तरी कृष्णसेवा करणे हेच त्याचे एकमात्र ध्येय असते.

कृष्णभक्त प्रत्येकाशी मित्रभावनेनेच वागतो. म्हणूनच म्हटले जाते की, तो शत्रूरहित, निर्वेरे असतो. हे कसे काय? कृष्णभावनाभावित भक्त जाणतो की, केवळ कृष्णभक्तीच मनुष्याला जीवनाच्या सर्व समस्यांतून मुक्त करू शकते. त्याला याचा वैयक्तिक अनुभव असतो आणि म्हणून त्याला कृष्णभावनेचा मानवसमाजात प्रचार करण्याची इच्छा असते. भगवद्भावनेच्या प्रचारार्थ ज्या भगवद्भक्तांनी आपले प्राणही संकटात टाकले त्या भक्तांची अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आपल्याला आढळतात. याबाबतीत प्रसिद्ध उदाहरण हे येशू ख्रिस्तांचे आहे. अभक्तांनी येशू ख्रिस्तांना कृसावर चढविले; परंतु भगवद्भावनेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचीही आहुती दिली. अर्थात, त्यांचा वध झाला असे म्हणणे उचित ठरणार नाही. त्याचप्रमाणे भारतातही हरिदास ठाकूर, प्रह्लाद महाराजांसारखी अनेक उदाहरणे आढळतात. भगवद्भक्त का बरे याप्रमाणे आपले प्राणही संकटात घालतात? तर केवळ कृष्णभावनेचा प्रसार करण्याचीच त्यांना इच्छा असते आणि असा प्रचार करणे अत्यंत कठीण असते. विस्मृतीने आपण दु:खी होतो. म्हणून आपल्या बांधवांना सर्व भौतिक समस्यांतून मुक्त करणे म्हणजे मानवसमाजाचे सर्वोत्तम कल्याण होय. अशा रीतीने शुद्ध भक्त हा भगवत्सेवेमध्ये संलग्न झालेला असतो. आता आपण कल्पना करू शकतो की, जे भक्त श्रीकृष्णांसाठी आपले जीवनही धोक्यात घालून भक्तीमध्ये संलग्न असतात त्यांच्याविषयी श्रीकृष्ण किती कृपाळू असतात. म्हणून देहत्यागानंतर अशा व्यक्तींचा सर्वोच्च लोकामध्ये, भगवद्धामामध्ये प्रवेश हा निश्चित असतो.

सारांश, अस्थायी विश्वरुप, सर्वभक्षक काळाचे रुप आणि चतुर्भुज विष्णुरुपही श्रीकृष्णांनी प्रकट केले. यावरून सिद्ध होते की, श्रीकृष्ण हेच या सर्व रूपांचे उगमस्थान आहेत. असे नाही की मूळचे विश्वरुप आहे आणि त्यापासून श्रीकृष्णांची किंवा श्रीविष्णूंच अभिव्यक्ती झाली. श्रीकृष्ण हे सर्व रूपांचे मूळ आहेत. विष्णुरूपेही अगणित आहेत; परंतु भक्ताला श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपधारी श्यामसुंदर रूपावाचून इतर कोणतेही रूप महत्वपूर्ण नसते. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की, जे श्रीकृष्णांच्या श्यामसुंदर रूपावर प्रेमाने आणि भक्तीने अनुरत झाले आहेत ते सदैव श्री श्यामसुंदर रूपाव्यतिरिक्त इतर काहीही आपल्या हृदयात पाहू शकत नाही. अकराव्या अध्यायाच्या तात्पर्यावरून मनुष्याने हेच जाणले पाहिजे की, कृष्णरूप हेच परमश्रेष्ठ आणि महत्वपूर्ण आहे.

या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘विश्र्वरुपदर्शन योग’ या अकराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com