वेदाबेस​

श्लोक 2 . 61

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१ ॥

शब्दार्थ

तानि - ती इंद्रिये; सर्वाणि-सर्व; संयम्य-संयमित करून; युक्त:- युक्त झालेला; आसीत-स्थिर असावे; मत्-पर:- माझ्याशी संबंधित; वशे- पूर्णपणे वश करून; हि-निश्चितपणे; यस्य-ज्याची; इन्द्रियाणी-इंद्रिये; तस्य- त्याची; प्रज्ञा-चेतना, भावना; प्रतिष्ठित-दृढपणे स्थिर होते.

भाषांतर

जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते.

तात्पर्य

योगसिद्धीची परिपूर्णता म्हणजेच कृष्णभावना, याचे या श्‍लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे आणि जोपर्यंत मनुष्य कृष्णभावनाभवित होत नाही तोपर्यंत त्याला इंद्रियांना संयमित करणे मुळीच शक्य नाही. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीष महाराजांशी भांडण उकरून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झाले व त्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरु शकले नाही. याउलट राजा अंबरीष दुर्वांसांच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवद्भक्त होते. त्यांनी दुर्वासांचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले. अंबरीष महाराज आली इंद्रिये संयमित करू शकले कारण श्रीमद्भागवतात (9.4.18-20) सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते.

sa vai manaḥ kṛṣṇa-padāravindayor
vacāṁsi vaikuṇṭha-guṇānuvarṇane
karau harer mandira-mārjanādiṣu
śrutiṁ cakārācyuta-sat-kathodaye
 
mukunda-liṅgālaya-darśane dṛśau
tad-bhṛtya-gātra-sparśe ’ṅga-saṅgamam
ghrāṇaṁ ca tat-pāda-saroja-saurabhe
śrīmat-tulasyā rasanāṁ tad-arpite
 
pādau hareḥ kṣetra-padānusarpaṇe
śiro hṛṣīkeśa-padābhivandane
kāmaṁ ca dāsye na tu kāma-kāmyayā
yathottama-śloka-janāśrayā ratiḥ

‘‘अंबरीष महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांशी स्थिर केले, वाचा भगवद्धामाचे वर्णन करण्यात रत केली, हातांनी भगवंतांच्या मंदिराचे मार्जन केले, कानांनी भगवत्लीलांचे श्रवण केले, नेत्रांनी भगवंतांचे रुप पाहिले, आपल्या शरीराने भगवद्भक्तांच्या शरीराला स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत्चरणावर अर्पिलेल्या फुलाचा सुवास घेतला, जिह्वेने भगवंतांना अर्पिलेल्या तुळशीपत्राचा रस घेतला, पायने भगवंतांचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळांचा प्रवास केला. मस्तकाने भगवंतांना दंडवत घातला आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली आणि या सर्व गुणांमुळे ते भगवंतांचा मत्-पर भक्त बनण्यास पात्र झाले.’’

या संदर्भात मत्-पर हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मत्पर होऊ शकतो हे अंबरीष महाराजांच्या जीवनावरून दर्शविण्यात आले आहे. मत्-पर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान व महान आचार्य श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात. मद्भक्तिप्रभावेन सर्वेन्द्रिविजयपूर्विका स्वात्मदृष्टि: सुलभेति भाव:-’ भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच केवळ इंद्रियांचे पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे.’ काही वेळा अग्नीचेही उदाहरण दिले जाते. ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो, त्याचप्रमाणे योग्याच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. योगसूत्रसुद्धा शून्याचे नाही तर श्रीविष्णूंचे ध्यान करण्यास सांगते. तथाकथित योगी जे विष्णुस्तरावर नसणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे ध्यान करतात ते केवळ आभासपूर्ण अशा गोष्टीचे व्यर्थपणे ध्यान करीत आपला वेळा निव्वळ वाया घालवितात. आपण भगवंतांवर आसक्त होऊन कृष्णभावनाभावित झाले पाहिजे वास्तविक योगाचा हाच अंतिम उद्देश आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com